- योगेश पांडेनागपूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली. मात्र असे असतानादेखील आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट करण्यात येत आहेत व जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला.
२०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशनात फडणवीस यांनी कायदा एकमताने मंजूर करून घेतला. मात्र त्यांनाच जरांगे पाटील टार्गेट का करत आहेत ही बाब शंकास्पद वाटते. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायम राहावे यासाठी विशेष प्रयत्न केले नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी आरक्षण दिले आणि टिकवून ठेवल्याबद्दल कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांचा पोटात दुखू लागले. गैर मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले म्हणून या नेत्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमार्फत आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे त्यांचा खरा चेहरा समोर आला. जरांगे पाटीलांनी हेदेखील तपासून पाहावे, असे खोपडे म्हणाले.