लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून नागपुरची चौफेर प्रगती सुरू आहे. परंतु असे करत असताना पर्यावरणाकडेदेखील लक्ष ठेवण्यात येत आहे. शासनाने तसा पुढाकारदेखील घेतला आहे. जर जनतेने या उपक्रमांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले तर शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. ‘सीएसआयआर’च्या ७७ व्या वर्धापन दिवसानिमित्त त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) हे आयोजन करण्यात आले होते.गुरुवारी ‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेला नेहमीच ‘नीरी’चे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आले आहे. ‘ग्रीनहाऊस गॅस एमिशन’ कमी करण्यासाठी झालेल्या ‘पॅरिस’ करारानुसार शहरातदेखील पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती नंदा जिचकार यांनी दिली. डॉ.राकेश कुमार यांनी स्वागत भाषणादरम्यान ‘नीरी’च्या कार्यावर प्रकाश टाकला. देशातील विविध शहरांमधील वायू, जल, भूमी प्रदुषणासंदर्भात ‘नीरी’ सातत्याने कार्य करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.पांडे यांनी अतिथींचा परिचय करुन दिला. मेहक व समृद्धी यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले. यावेळी ‘नीरी’त २५ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला.दरम्यान, ‘नीरी’त विदर्भातील ४० शाळांतील सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प व उपक्रमांची माहिती दिली. शिवाय काही प्रयोगांचे सादरीकरणदेखील करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचीदेखील त्यांनी उत्तरे दिली.विद्यार्थ्यांचा झाला सत्कार‘नीरी’तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान ‘मॉडेल्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. यात इरा इंटरनॅशनल स्कूल, मॉडर्न स्कूल (नीरी), आर.एस.मुंडले हायस्कूल, माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल, ललिता पब्लिक स्कूल, टीबीआरएएन मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू आॅपोस्टोलिक इंग्लिश स्कूल, सांदिपनी ज्युनिअर कॉलेज, डॉ.आंबेडकर कॉलेज या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल : नंदा जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:48 PM
मागील काही काळापासून नागपुरची चौफेर प्रगती सुरू आहे. जनतेने या उपक्रमांमध्ये पूर्णपणे सहकार्य केले तर शाश्वत विकासात नागपूर जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्दे‘सीएसआयआर’चा ७७ वा वर्धापन दिवस साजरा