नागपूर : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना नागपुरातदेखील प्रतिअयोध्याच साकारणार आहे. शहरातील मुख्य चौकांपासून ते गल्ल्यांपर्यंत रामनामाचाच जप निनादेल असे नियोजन करण्यात आले आहे. नागपुरात त्या दिवशी सहा हजार स्थानांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन तासांतच शहरातील हजारहून अधिक मंदिरांत पूजाअर्चना होणार असून शहरातील प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पक्षातर्फे संयुक्त पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या तयारीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी विहिंपचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे मंत्री गोविंद शेंडे, श्रीरामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीचे महानगर संयोजक अमोल ठाकरे, सह संयोजक गौरव जाजू, भाजपचे प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, भावना भगत प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील सहा हजार स्थानांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या ३६२ वस्तींमध्ये वस्तीप्रमुख नेमण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वस्तीतील तीन ते चार मंदिरांत कार्यक्रम होतील, अशी माहिती देण्यात आली.
शहरातील पाच लाख घरांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचल्या अक्षतअयोध्येतून आलेल्या पवित्र अक्षतांचे घरोघरी वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. नागपुरातील ५.३२ लाख घरांपर्यंत प्रत्यक्ष अक्षता पोहोचल्या आहेत. रविवारपर्यंत अक्षत वितरण करण्यात येणार आहे. या निमंत्रण मोहिमेत १६ हजार ९७६ कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात ६ हजार ५२९ महिला व १ हजार ८६० विद्यार्थ्यांचा समावेश होता.
सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती२२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत शहरातील सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील साईमंदिरात किन्नर समाजातर्फे आरती करण्यात येणार आहे. तर बहुतांश ठिकाणी कारसेवेत सहभागी झालेल्या नागरिकांना आरतीचा मान देण्यात येणार आहे.
- अशी अवतरणार नागपुरात अयोध्या- ४० विविध जागी ढोलताशांचा गजर- प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळी अयोध्येतील सोहळ्यातील थेट प्रक्षेपणासाठी स्क्रीन्स- प्रमुख रस्त्यांवर रोषणाई, श्रीरामांच्या प्रतिमा व भगवे झेंडे- सर्वच चौकांत आतिषबाजीचे नियोजन- सहा हजार जागी प्रसादाचे वितरण करणार- वस्त्यावस्त्यांमधील मंदिरात दिवे लावणार, पूजा होणार- अनेक मंदिरांमध्ये भजन-किर्तनाचे आयोजन