नागपूर : नागपूरला भाजपचा गड मानले जाते. मात्र, कुठलाही गड हा कायम नसतो. अशी अनेक गड कोसळून पडली आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर प्रहार केला. रविवारी होणाऱ्या वज्रमूठ सभेनंतर नागपूर भाजपचा गड आहे की, महाविकास आघाडीचा हे दिसून येईल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी खा. राऊत शुक्रवारी नागपुरात आले. यावेळी त्यांनी दर्शन कॉलनी येथील सभास्थळाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेसाठी रविवारी नागपूरला येतील. सभेला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजप नेत्यांच्या पोटात दु:खू लागले आहे. नागपूर कुणाचा गड आहे याचा भाजप नेत्यांनाही आता विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
वज्रमूठ सभेला होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले की, केवळ भाजपचेच लोक विरोध करीत आहेत. नागपुरात होणारी ही सभा संभाजीनगरात झालेल्या सभेपेक्षाही मोठी होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.