मुख्यमंत्र्यांची ग्वाही : ६० कोटी रुपयांच्या खापरी येथील उड्डाण पुलाचे भूमिपूजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहर आणि लगतच्या भागात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे ६५ हजार कोटींची कामे या अंतर्गत होणार असून नागरिकांना सुविधा निर्माण झाल्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने ६० कोटी रुपये खर्चून खापरी येथील रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कोनशिलेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर आदी उपस्थित होते. नागरिकांच्या सुविधांसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. खापरी उड्डाण पूल हा अतिशय अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे ६० कोटी रुपये खचार्चा १.१२० किलोमीटरचा पूल बांधण्यात येत आहे. याचा फायदा दक्षिण नागपुरातील नागरिकांना होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे टिष्ट्वनस्टार या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी नागपुरात १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. नागपूर परिसरातील ही सर्वात मोठी गुंतवणूक असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. गेल्या तीन वर्षात देशात २२ हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात समृद्धी महामार्ग आणि रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान प्रकल्पामुळे नागपूरच्या विकासात भर पडली आहे. उड्डाणपुलामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. प्रारंभी चिंचभवन येथील नागरिकांनी नितीन गडकरी यांचा सत्कार केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य डी. ओ. तावडे यांनी प्रकल्पाची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले. प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी आभार मानले. वर्षभरात रेल्वे उड्डाणपूल उभारा - गडकरी खापरी रेल्वे उड्डाणपुलाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. नव्या चौपदरी उड्डाणपुलामुळे ही मागणी पूर्ण होणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. परंतु वर्षभरातच हे काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले. नागपूर परिसरात सुमारे ६५ हजार कोटींची कामे करण्यात येत आहते. ही कामे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी चांगले डिझाईन करण्यावर भर देण्यात आला आहे. खापरी येथील नव्या रेल्वे उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्याबरोबरच अपघातविरहित वाहतूक होण्यास मदत मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. एचसीएल कंपनीने काम सुरू केले आहे. कंपनीत काही महिन्यात नागपूर शहर व आसपासच्या दोन हजार युवा इंजिनीअरला काम मिळणार आहे. मिहानमधये आतापर्यंत १३ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. भाजपाच्या पाच वर्षांच्या काळात येथे ५० हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली. १६ हजार कोटींची गुंतवणूक टिष्ट्वनस्टार या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी नागपुरात १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने प्रकल्पासाठी बुटीबोरी परिसरात जमीन घेतली आहे. राज्य सरकारने कंपनीला आवश्यक मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी प्रकल्पाला सुरुवात करणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
विकासकामांमधून नागपूरचा चेहरा बदलविणार
By admin | Published: June 26, 2017 2:05 AM