लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवरात्र म्हणजे केवळ धार्मिक विधिविधान नव्हे तर आर्थिक उलाढालीचा मोठा सोहळा असतो. त्याच अनुषंगाने या उत्सवाशी सर्वच मतावलंबीयांचा जवळचा संबंध असतो. यंदा मात्र हा उत्सव इतर उत्सवांप्रमाणेच शांततेने पार पडणार आहे. जल्लोष नसला तरी उत्साह कायम आहे आणि आतापर्यंत आलेली व्यवसायावरील मरगळ नवरात्राच्या झगमगाटात पुसली जाणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील मोठमोठी मंडळे देशातील वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थान, तीर्थस्थळाचे देखावे उभे करत असतात. ही तयारी दोन महिने आधीपासूनच सुरू झालेली असते. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम म्हणून यंदा असले देखावे कुठेच उभारले जाताना दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर या उत्सवाला आता केवळ दहाच दिवस उरले असतानाही कोणत्याच मंडळाकडून, देवस्थानाकडून पेण्डॉल उभारण्याची तयारी दिसत नाही. विशेष म्हणजे, देवस्थानाच्या रंगरंगोटीलासुद्धा यंदा मंडळे व देवस्थान कमिटी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. आधीच स्थानिक प्रशासनाकडून नवरात्रोत्सवाच्या मार्गदर्शिका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने जवळपास सर्वच मंडळांनी गरबा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अखंड ज्योत प्रज्वलित करण्याच्या निर्णयावरही सर्वच मंडळे आणि देवस्थानांमध्ये अद्याप चर्चाच सुरू आहे. त्यातच देवस्थानेही अद्याप उघडण्याचा निर्णय शासनाकडून आलेला नाही. असे असतानाही भक्तांची भक्ती कुठेही कमी झालेली नाही. उलट यंदा उत्सवाला संरक्षणाचे महत्त्व प्रतिपादित होणार आहेत. त्याच अनुषंगाने तयारीही सुरू आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार!
नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येक मंडळे देखावे, शामियाने, गरबा आणि इतर व्यवस्थेसाठी लाखो-कोट्यवधी रुपये भाविकांच्या देणगीतून खर्च करत असतात. हा लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च अनेकांसाठी रोजगाराचा विषय ठरत असतो. मात्र, आशेचे किरण प्रोत्साहित करणारे ठरत आहे. बाजारातील गर्दी वाढायला लागली आहे. आणि त्याअनुषंगाने खूप नसले तरी बाजारात सकारात्मकता दिसायला लागली आहे.
यात्रांना बसणार फटका
नवरात्रोत्सवात शहरातील प्राचीन व ऐतिहासिक देवस्थानांकडे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग असते. कोराडीची जगदंबा माता देवस्थान, पारडी येथील भवानीमाता देवस्थान, महालातील श्रीमहालक्ष्मीमाता देवस्थान, रेणुकामाता देवस्थान अशी काही स्थळे आहेत, जी या काळात भाविकांच्या यात्रेने गजबजलेली असतात. शिवाय, डोंगरगड, माहूरगड अशा ठिकाणीही नागपुरातील भाविक यात्रेला जात असतात. यंदा या सर्वच यात्रा कोरोनामुळे बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात होती.