लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची भूमिका निभावली आहे.प्रवाशांची सुरक्षा हे नागपूर मेट्रोचे उद्दिष्ट आहे. बांधकामादरम्यान एखादा अपघात घडल्यास संबंधित वाहनचालकाला किंवा अपघातग्रस्त नागरिकांना आर्थिक मदतीसह त्याला मानसिक आधार देण्याचे कार्य मेट्रो अधिकारी बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विश्लेषण करून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. त्यासाठी मेट्रोतर्फे जनरल कन्सल्टंट आणि सुरक्षा तज्ज्ञ आपली जबाबदारी पार पाडत आहेत तसेच मॉक ड्रीलसारखे उपक्रम राबविले जात आहेत.मेट्रो मार्गावरील विद्युत केबल हटविण्याचे कार्य सुरूनागपूर मेट्रोतर्फे बांधकाम करताना नागपूर शहरातील विविध एजन्सींना विश्वासात घेऊन बांधकाम आणि खोदकाम करण्यात येत आहे. मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, दूरसंचार विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनींना पूर्वसूचना देऊन आणि त्यांच्यासोबत समन्वय साधून काम करण्यात येत आहे.याकरिता १.३ टक्के देखरेख शुल्क महामेट्रोतर्फे देण्यात येत असून आजपावेतो खोदकाम आणि बांधकाम करतेवेळी लाखो रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देण्यात आले आहे. जमिनीवरून मेट्रो सेवा नागपूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू होणार आहे. तसेच यावर्षीच्या अखेरपर्यंत वर्धा मार्गावरील मेट्रोची सेवा नागरिकांसाठी सुरू करण्याचा मानस महामेट्रोतर्फे निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम कॉरिडोरवरील बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.
नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज अव्वलदेशातील अन्य मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे अधिकृत फेसबुक पेज अव्वल ठरले असून ४.३५ लाख लोकांनी लाईक केले आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाने कोची मेट्रो प्रकल्पाला मागे टाकले आहे. फेसबुक मित्रांचे अभिनंदन करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, १२ जानेवारी २०१५ रोजी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज सुरू झाले. ७ सप्टेंबर २०१५ ला १ लाख फेसबुक फे्रंड बनले होते. ११ जुलै २०१६ ला संख्या वाढून २ लाखांवर गेली होती. ४ मे २०१७ ला ३ लाख आणि १८ डिसेंबर २०१७ ला ४ लाखांचा आकडा पार केला होता. आता १० एप्रिल २०१८ ला ही संख्या ४,३५,३२० वर पोहोचली आहे. यासोबत नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज अन्य मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत अव्वल ठरले आहे.