लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कॅगकडून अजूनही ६६ हजार कोटींच्या निधीचा विनियोग प्रमाणपत्र अजूनही यायचे आहे. त्याची वाट न पाहता सत्तारुढ पक्षातील काही नेते हा घोटाळा घडल्याचा आरोप करीत आहेत. पण हा आरोप धादांत खोटा असून कॅगकडून प्रमाणपत्र आल्यानंतरच खरी बाब त्यांच्या ध्यानात येईल. असा बिनबुडाचा आरोप त्यांनी करू नये असे मत राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.यापूर्वीही २०१४ च्या कॅगच्या अहवालात ८० हजार आणि ७६ हजार कोटींचे विनियोग प्रमाणपत्र आले नव्हते. त्यामुळे आताच्या कॅगच्या प्रमाणपत्राची वाट सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांनी पहावी मगच आरोप करावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत देण्याची घोषणा केली होती. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आम्ही यू फॉर उद्धव असे त्यांना संबोधतो, पण आज त्यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही तर, यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल. केवळ २१ दिवसच झाले आहेत अशी सबब सरकारने सांगू नये. त्याची तरतूद अर्थ संकल्पात करावी असे ते पुढे म्हणाले. शपथपत्रात सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घोषणेची वाट पहात आहोत. शेतकरी बांधवांनाही मदतीची अपेक्षा आहे. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, सरकारला वाटल्यास त्यांनी आधीच्या सरकारची श्वेतपत्रिका काढावी. सरकारची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. कॅगने हे आपल्या अहवालात राज्याचे कौतुक करून महसूल वाढीचा दर चांगला असल्याचे म्हटले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; तर, उद्धव यांना यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 2:42 PM