सुरेश भुसारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हुर्डा पार्टीसाठी राहणार नसून यात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रश्नांची तड लावण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात येईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते दिल्लीत आले आहेत. ते म्हणाले, ऐतिहासिक नागपूर करारानुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन होते. नागपूर करारामध्ये हिवाळी अधिवेशन सहा आठवड्यांचे व्हावे, असे नमूद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक चालले नाही.या अधिवेशनामध्ये विदर्भातील प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, असा या अधिवेशनामागचा उद्देश आहे. परंतु हे अधिवेशन ‘हुर्डा पार्टी’साठी प्रसिद्ध झाले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची ही प्रतिमा आगामी काळात मोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विदर्भाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सत्तारुढ व विरोधी पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहिले अधिवेशन अल्पकाळनव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विधानसभा अध्यक्षपदी माझी निवड होण्यापूर्वीच या अधिवेशनाचे कामकाजही निश्चितच झाले होते. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन फार काळ चालणार नाही. परंतु, पुढील वर्षांपासून नागपुरातील हिवाळी अधिवेशन जास्तीतजास्त काळ व्हावे, यासाठी आपला प्रयत्न राहील. विधानसभेत यावेळी विरोधक प्रबळ असल्याची आपल्याला कल्पना असल्याचे सांगून ते म्हणाले, विकासाच्या मुद्यावर विरोधकांना पूर्ण संधी दिली जाईल. परंतु, आकसाने किंवा केवळ प्रसिद्धीसाठी विधानसभेत कुणी गोंधळ घालत असल्यास ते चालणार नाही. संसदीय प्रथा, परंपरांच्या पालनाची सत्ताधारी व विरोधकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामकाज सुधारण्यासाठी प्रयत्नविधानसभेच्या कामकाजात काय सुधारणा करता येईल, यासंदर्भात आपण लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याशी चर्चा केल्याचे पटोले यांनी सांगितले. लोकसभेच्या धर्तीवर विधानसभेचेसुद्धा कामकाज व्हावे, यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.