नागपूर- नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसंच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सोमवारी सकाळी विधानभवनाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है! अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीवर चर्चा घ्यावी व बोंडअळीने पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर विधानभवनात जोरदार गदारोळ सुरू झाला. विखे-पाटील यांनी सोबत 100 रूपयांचा स्टॅम्प पेपर आणला होता. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, हे मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळी ने नुकसान झालेले कापसाचे बोंडाचं असलेले पाकीट सोपवले व हात जोडत मदत जाहीर करण्याची मागणी केली
त्यानंतर विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिलं. 1 हजारच्या स्टॅम्प पेपर वर लिहून देतो 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारच्या कर्जमाफीत विदर्भाला जेवढे पैसे मिळाले तेवढे आम्ही एकट्या बुलढाणा जिल्ह्याला दिले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. विरोधकांचे हे मगरमछ के आसू आहेत. जेव्हा या मुद्द्यावर चर्चा करू तेव्हा दूध का दूध.. पानी का पानी करून दाखवू असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं.
दरम्यान, विधाभवनात विरोधकांचा गोंधळ सुरु असून गदारोळातच सरकार ने कामकाज पुढे रेटले आहे विरोधकांनी सभात्याग केला आहे.