लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका महिलेला (वय २८) मारहाण केली. तिच्या वेणीचे केस कापून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आणि धमकी देऊन पळून गेले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुयोगनगर गार्डनजवळ सोमवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.पीडित महिला प्रतापनगरात राहते. तिची आई सुयोगनगरात राहते. आईला भेटण्यासाठी ती सोमवारी दुपारी ३ वाजता आॅटोने छत्रपती चौकात आली. तेथून ती पायीच आईच्या घराकडे निघाली. सुयोगनगर गार्डनजवळून जात असताना एका स्कुटीवर तीन जण आले. त्यांनी महिलेचा हात पकडला. ‘तू तुझा मोबाईल नंबर का बदलवला’, असे विचारून त्यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यानंतर तिला हातबुक्कीने मारहाण केली. एकाने तिच्या वेणीचे केस कापले आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पळून गेले. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने आधी आपल्या आईच्या घरी जाऊन नातेवाईकांना ही घटना सांगितली. त्यानंतर सायंकाळी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी विनयभंग, मारहाण करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आजूबाजूच्यांना विचारणा केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींसंबंधीची फारशी माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.फसवणुकीचा राग?अजनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तिने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांकडून लाखोंची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. तिला आपले पैसे परत मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिने कर्जदाराच्या तगाद्यामुळे आपला मोबाईल नंबर बदलवला असावा, त्यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. तक्रारदार महिलेने आपण आरोपींना ओळखत नाही. मात्र, फसवणूक प्रकरणाशी संबंधित असलेल्यांपैकीच आरोपी असावेत, असा संशय तिने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे.
नागपुरात महिलेच्या वेणीचे केस कापून विद्रूप करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 8:30 PM
दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका महिलेला (वय २८) मारहाण केली. तिच्या वेणीचे केस कापून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आणि धमकी देऊन पळून गेले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुयोगनगर गार्डनजवळ सोमवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.
ठळक मुद्देमारहाणही केली : तीन आरोपींविरुद्ध अजनीत गुन्हा दाखल