नागपूर : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चालवताना रंगेहात पकडलेल्या आरोपीच्या साथीदारालाही सदर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष गुलाबराव डोईफोडे (३३, रा. टेलर लाइन, सदर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या झेरॉक्स दुकानातून नोटा तयार करण्यात आल्या होत्या.
पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन २० रुपयांचा नाश्ता करून उरलेले सुटे पैसे घेऊन निघून जाणाऱ्या विजय दशरथ थोराईत (वय ४२, बैरामजी टाउन) याला पोलिसांनी एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने झेरॉक्स सेंटरमधून या नोटा तयार करून घेतल्याची बाब समोर आली. विजयने झेरॉक्स सेंटर चालवणाऱ्या संतोषची दिशाभूल करून दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या.
५०० ची बनावट नोट देऊन २० चा नाश्ता, उरलेले पैसे खिशात घालायचा; असा अडकला जाळ्यात
वराचा हार बनवण्यासाठी आणि लग्नाच्या वरातीसाठी बनावट नोटांची गरज असल्याचे त्याने संतोषला सांगितले होते. त्याच्या बोलण्यात येऊन संतोषने महिन्याभरात कलर प्रिंटरच्या मदतीने २ लाख २२ हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या. पोलिसांनी संतोषला शुक्रवारी चौकशीनंतर अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.