नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाच्या आत्महत्येवरून संतप्त कुटुंबीयांनी पाचपावली पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पत्नीच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. बसपाचे माजी नगरसेवक नरेंद्र वालदे यांचा मुलगा शंतनू (२७, जरीपटका) असे मृताचे नाव आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये शंतनूचा कृतिका नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही कालावधीतच पतीशी वाद झाल्याने ती माहेरी परतली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. १८ सप्टेंबरला शंतनू पत्नीला भेटायला सासरी जरीपटक्यात गेला. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात शंतनूविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे शंतनू दुखावला होता. १८ सप्टेंबरच्या रात्री शंतनू कृतिकाच्या घरी गेला होता. तेथे त्यांच्यात परत वाद झाला. कृतिकाचे वडील रवी यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत शंतनूला अटक करण्यात आली.
१९ सप्टेंबरला त्याला जामीन मिळाला. मात्र या प्रकारामुळे तो कमालीचा दुखावला होता व त्याने त्याच रात्री राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. बुधवारी दुपारी शवविच्छेदनानंतर शंतनूचे कुटुंबीय आणि बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मृतदेह घेऊन पाचपावली पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी करत शंतनूला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस असल्याने कृतिकाच्या वडिलांनी विभागाचा वापर केला असा आरोपदेखील लावला. ठाणेदार वैभव जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शंतनूच्या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.