रामटेक (नागपूर) : मित्रांसाेबत नातेवाईकाकडे पाहुणा म्हणून आलेला नागपूर शहरातील तरुण आंघाेळ करण्यासाठी कालव्यात उतरला आणि प्रवाहात आल्याने वाहात गेला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्रामपूर (नवरगाव) शिवारात बुधवारी (दि. १९) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.
आशिष सुनील मोरे (२२, रा. गुरुदत्त कॉलनी, दाभा, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आशिष त्याच्या तीन मित्रांसाेबत संग्रामपूर (नवरगाव, ता. रामटेक) येथील नितीन माणिकराव हांडे यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. ताे सायंकाळी मित्रांसाेबत गावालगतच्या पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या परिसरात फिरायला गेला. कालव्यात पाणी असल्याने त्याला आंघाेळ करण्याचा माेह आवरला नाही. कालव्यात उतरताच पाय घसरला आणि ताे पाण्यात पडून प्रवाहात आल्याने वाहात गेला.
मित्रांनी या प्रकाराची माहिती आशिषच्या नातेवाईकांसह नागरिकांना दिली. शिवाय, पाेलिसांनाही कळवण्यात आले. त्या सर्वांनी लगेच त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. रात्री अंधार झाल्याने थांबविण्यात आलेले शाेधकार्य गुरुवारी (दि. २०) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात घटनास्थळापासून पाच किमीवर असलेल्या हाताेडी (ता. रामटेक) शिवारातील कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पांडे तपास करीत आहेत.