निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : 'सायको समझो तो' या लघुपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर धूम केली आहे. आता तर भारताकडून ऑस्करच्या शर्यतीसाठी निवड केलेल्या पाच लघुपटांमध्ये या लघुपटाचा समावेश आहे. नागपूरकर निखिल शिरभाते या तरुण दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, हे विशेष.
निखिल वसंतराव शिरभाते हा नागपूरचा तरुण १२ वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला आहे. जेमतेम १२ वी केल्यानंतर थेट मुंबई गाठली आणि संघर्ष सुरू झाला. चित्रपटाबाबतचे तांत्रिक शिक्षण नाहीच, होती ती फक्त आवड. प्रयत्न करता करता जसबीर भाटी या मालिका दिग्दर्शकाने निखिल शिरभाते त्याला मदतीसाठी ठेवले. तिथूनच सिरियल, चित्रपट दिग्दर्शनाचे बारकावे शिकत तो हळूहळू काम करीत राहिला. मजल दर मजल करीत चार मालिकांचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम सांभाळले. या काळात वेबसिरिजमध्येही हात आजमावणे सुरू केले. असे करीत आतापर्यंत ४ फिल्म आणि ८ ते १० वेबसिरीजच्या निर्मितीत दिग्गज दिग्दर्शकांसोबत निखिलचा सहभाग राहिला आहे. दरम्यान, त्याने अनेक जाहिराती व लघुपट केले. आतातर त्याने स्वतंत्रपणे वेबसिरीज करणे सुरू केले आहे. मराठीतील 'शांताराम वर्सेस मेनी' ही त्याची वेबसिरीज होय.
सतीश मोहोड यांच्या ऑरेंज सिटी प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'सायको समझो तो' या १० मिनिटाच्या लघुपटाचे चित्रीकरण निखिलने कुही तालुक्यातील डोंगराळ भागात केले. चित्रपटात अभिनेता गौरीशंकर व इतरांनी काम केले आहे. ही एका कलाकाराची कथा आहे, जो अपयशामुळे वेडा होतो पण त्याच्या बरे होण्याचे गुपितही त्याच्या कलेतच आहे, हेही यातून अधोरेखित होते. कलावंताचे झपाटलेपण आणि त्याची मानसिकता खोलवर उतरविण्याचा प्रयत्न या लघुपटातून केला आहे. निवडलेल्या लघुपटाचे ऑस्करच्या परीक्षकांसमोर स्क्रिनिंग होईल व एका सर्वोत्तम चित्रपटाची निवड केली जाईल. यापूर्वी नवी दिल्ली येथे फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाला पुरस्कार मिळाला तर वर्ल्ड इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे ऑस्करही गाठेल, असा विश्वास निखिल शिरभातेने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.