लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आघाडीत लढूनही काँग्रेसने राष्ट्रवादीचा जाणून गेम केला. पहिले उपाध्यक्षावरून राष्ट्रवादीला हात धुवावे लागले. आता दोन सभापतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला एक सभापतिपद देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली.जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदाकरिता गुरुवारी झालेल्या निवडणुकीत तीन पद काँग्रेसच्या वाट्याला तर एक पद राष्ट्रवादीला मिळाले. काँग्रेसचे तापेश्वर वैद्य, भारती पाटील व नेमावली माटे यांची सभापतिपदी निवड झाली; तर राष्ट्रवादीच्या उज्ज्वला बोढारे यांना एक सभापतिपद काँग्रेसने बहाल केले.जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात सभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणुकीला पीठासीन अधिकारी नागपूर शहराचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, सहायक अधिकारी सारिका धात्रक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, नायब तहसीलदार प्रफुल्ल लांजेवार होते. सभापतिपदासाठी काँग्रेसकडून विशेष समितीसाठी तापेश्वर वैद्य व भारती पाटील यांनी अर्ज भरला होता, तर राष्ट्रवादीने चंद्रशेखर कोल्हे यांचा अर्ज दाखल केला होता. भाजपानेही अनिल निधान आणि भोजराज ठवकर यांचा अर्ज दाखल केला होता. यातून चंद्रशेखर कोल्हे यांनी अर्ज मागे घेतल्याने, चार सदस्यांसाठी निवडणूक झाली. यात तापेश्वर वैद्य व भारती पाटील यांना प्रत्येकी ४३ मते पडली.महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला बोढारे, काँग्रेसच्या ज्योती राऊत व भाजपाच्या अर्चना गिरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ज्योती राऊत यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बोढारे व अर्चना गिरी यांच्यात झालेल्या लढतीत बोढारे यांना ५८ पैकी ४३ सदस्यांनी समर्थन दिले. समाजकल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसच्या नेमावली माटे व भाजपाचे सतीश डोंगरे यांनी अर्ज दाखल केला होता. दोघांमध्ये झालेल्या निवडणुकीत नेमावली माटे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली.दरम्यान, गुरुवारी सकाळपासून रविभवनात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यात तडजोड सुरू झाली. पालकमंत्री नितीन राऊत, युवक कल्याण मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर, आमदार राजू पारवे, कुंदा राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग यांच्यात चर्चा झाली. अखेरच्या वेळी राष्ट्रवादीने नमते घेत तडजोड केली.अखेरच्या क्षणी कोल्हेंना फोनउपाध्यक्ष पद न मिळाल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे दोन सभापतीचा प्रस्ताव ठेवला होता. गुरुवारी सकाळपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची रविभवनात बैठक सुरू होती. पण काँग्रेसचे नेते एकच सभापतिपद देण्याच्या भूमिकेवर कायम होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला बोढारे व चंद्रशेखर कोल्हे यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले. सभागृहात दोघांचेही अर्ज वैध ठरविण्यात आले. पीठासीन अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ५ मिनिटांचा वेळ दिला. तेव्हा कोल्हे यांच्या मोबाईलवर वरिष्ठांचा फोन आला. त्यांनी बोढारे यांच्याशी संवाद साधला. पण बोढारे आपल्या जागीच बसल्या. अखेर नमते घेत राष्ट्रवादीचे कोल्हे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तिकडे काँग्रेसने ज्योती राऊत यांचा अर्ज मागे घेत, राष्ट्रवादीच्या बोढारे यांना समर्थन दिले. त्यामुळे राष्ट्रवादीनेही एक पाऊल मागे घेत काँग्रेसच्या तीन सदस्यांना समर्थन दिले.अशा ठरल्या विषय समित्यामहिला व बालकल्याण सभापती : उज्ज्वला बोढारे (राष्ट्रवादी)समाजकल्याण सभापती : नेमावली माटे (काँग्रेस)कृषी व पशुसंवर्धन सभापती : भारती पाटील (काँग्रेस)शिक्षण व अर्थ सभापती : तापेश्वर वैद्य (काँग्रेस)
नागपूर जिल्हा परिषद सभापती निवडणूक : काँग्रेसकडून राष्ट्रवादीची बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:24 PM
आघाडीत लढूनही काँग्रेसने राष्ट्रवादीचा जाणून गेम केला. पहिले उपाध्यक्षावरून राष्ट्रवादीला हात धुवावे लागले. आता दोन सभापतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला एक सभापतिपद देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली.
ठळक मुद्देएक सभापतिपद देऊन मिळविले तीन पदांचे समर्थन : बोढारे, माटे, वैद्य, पाटील नवे सभापती