लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना सुरू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ४३४० शाखा नागपूरतर्फे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. वरील मागण्या शासन स्तरावर अनेक वर्षापासून प्रलंबित असुन शासन मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे जि. प. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संपूर्ण राज्यात घंटानाद आंदोलनाची हाक संघटनेने दिली होती. सहाव्या वेतन आयोगात ज्या संवर्गावर अन्याय झाला, त्या संवर्गाच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासंदर्भात शासनाने बक्षी समिती व रिंगणे समिती नेमली. परंतु समित्यांचा अहवाल शासनास प्राप्त झाला नसतानाही पुन्हा तिसऱ्या समितीची स्थापना करुन कर्मचाऱ्यांना गाजर दाखविलेले आहे, अशी ओरड कर्मचाऱ्यांची होती. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात संजय सिंग, अरविंद अंतुरकर, सुदाम पांगुळ, सुजित अढाऊ, सुभाष पडोळे, किशोर भिवगडे, जयंत दंडारे, चंद्रकांत चरडे, मधुकर सोनुने, डॉ. रमेश गोरले, विजय कोकर्डे, सतीश देहारे, अक्षय मंगरुळकर, विजय बुर्रेवार, राहुल देशमुख, वसंत वसु, अरुण थापे, अपूर्वा घटाटे, वनिता थाटे, संध्या सातपुते आदींचा समावेश होता.