लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विषय समितीच्या सभापतींवरून रंगलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसने विराम दिला. भारती पाटील यांच्याकडे शिक्षण व वित्त समितीची जबाबदारी दिली तर कृषी व पशुसंवर्धन समितीचे तापेश्वर वैद्य सभापती बनले.सोमवारी सकाळी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर दुपारी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी विषय समितीच्या वाटपाची घोषणा केली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर ३० जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. निवड झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या कक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे तापेश्वर वैद्य यांना कृषी समितीच्या कक्षात बसावे लागले. पण समितीचे सभापती कोण, हे काही निश्चित झाले नव्हते. सूत्राच्या माहितीनुसार भारती पाटील यांनी शिक्षण समितीच्या सभापतीसाठी विषय प्रतिष्ठेचा केला होता. तिकडे तापेश्वर वैद्य यांनी कृषीत राम नसल्याची ओरड करीत शिक्षणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे विषय समितीवर सभापती निवडीचा तिढा वाढतच होता. १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या आमसभेत हा तिढा सुटेल अशी अपेक्षा होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार सभागृहातच घोषणा झाली असती, तर गोधळ उडाला असता, अशी भीती असल्याने सभापती निवडीचा चेंडू जि.प. अध्यक्षाच्या कोर्टात टाकला. या निर्णयामुळे सभापतींमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली. तिकडे राष्ट्रवादीने विषय समितीच्या सभापती निवडीवरून काँग्रेसला घरचा अहेर दिला.सभापती निवडीवरून चौफेर टार्गेट होत असल्याचे लक्षात घेता, सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात तातडीने बैठक घेऊन सभापतींची निवड करण्यात आली. शिक्षण व वित्त समिती, कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी सभापती निवडल्यामुळे बांधकाम व आरोग्य समिती उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आली.आम्ही नाराज नव्हतोचसभापती निवडीची घोषणा झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास तापेश्वर वैद्य व भारती पाटील जिल्हा परिषदेत आल्या. वैद्य यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. आम्ही नाराज नव्हतोच तांत्रिक कारणाने वाटपास उशीर झाल्याचे ते म्हणाले. पण त्यांनी कृषीत काही राम नसल्याची खंत वारंवार बोलून दाखविली. भाजप सत्तेत असताना कृषीकडे लक्ष न दिल्याने कृषीच्या सर्व योजना राज्याकडे स्थानांतरित झाल्यामुळे, काम करण्यास स्कोप नसल्याची भावना बोलून दाखविली.