लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोनाच्या संक्रमणावर आळा घालण्यासाठी आठवडाभरासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यालय लॉकडाऊन केले आहे. जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर व अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १८ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह निघाले. तर उपविभागीय कार्यालयातील एक कर्मचारी व जि.प. अध्यक्षाचे पतीसुद्धा कोरोनातून मुक्त झाले आहेत. मुख्यालयात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती. कर्मचारी संघटनांनी आपल्या तक्रारी सीईओंकडे केल्या होत्या. अखेर सीईओंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आठवडाभरासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यालय लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून पुढच्या रविवारपर्यंत जिल्हा परिषदेत लॉकडाऊन राहणार आहे. आरोग्य विभागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभाग बंद राहणार आहेत.