लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात पहिल्यांदा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच निधी खर्च करता येणार होता. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींसाठी खर्च करता यावा म्हणून निधी खर्चाचे अधिकार जि. प. अध्यक्षांना देण्यात आले. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २५ टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना दिले आहेत. पण हा निधी कुठल्या बाबींवर खर्च करावा यासंदर्भातील नियोजन नसल्याने तो निधी खर्च करताना ग्रामसेवकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जि.प.ने हा निधी कुठल्या बाबींवर खर्च करावा याचे नियोजन करून ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात, अशी मागणी जि.प. सदस्य संजय झाडे यांनी केली. त्याचबरोबर १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याबरोबर गरीब गरजूंना त्यातून धान्य देता येईल, यासंदर्भातही उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अध्यक्ष बर्वे यांनी पंचायत विभागाला दिले.कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढल्यास अशा रुग्णांसाठी क्वारंटाईनची काय व्यवस्था केली आहे. सध्या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची संख्या वाढली असल्याने डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनिल निधान यांनी केली. बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी क्लिनिक बंद करून ठेवले आहेत. या डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करून तसेच सरकारी आरोग्य केंद्रात दोन तास द्यावे, अशी विनंती अध्यक्ष बर्वे यांनी डॉक्टरांना केली आहे.आशावर्करला द्यावे थर्मामीटरग्रामीण भागात आशावर्करच्या माध्यमातून कोरोनाचा सर्वे सुरू आहे. त्या फक्त तोंडी विचारत आहेत. अनेक जण कोरोनाच्या भीतीमुळे चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे आशावर्करला थर्मामीटर देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.पाणीटंचाईची बैठक जानेवारीत घ्याजिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आता प्रस्ताव आल्यानंतर त्यावर उपाययोजना कधी होईल? टंचाईची कामे कधी सुरू होतील. दरवर्षी टंचाईची मोठ्या संख्येने कामे अपूर्ण राहतात. हे लक्षात घेता पाणीटंचाईची बैठक जानेवारीत घेण्यात यावी, अशी मागणी संजय झाडे यानी केली.जिल्ह्यासाठी खनिज निधीतून २० लाखाचा निधीजि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पशु व दुग्धसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी २० लाख रुपयाच्या निधीची मागणी केली होती. यातून मास्क, सॅनिटायझर व निर्जंतुकीकरणासाठी औषधांची फवारणी करायची होती. जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज प्रतिष्ठानातून २० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.