नागपूर : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून जिल्हा परिषद ग्रामस्थांची इम्युनिटी वाढविण्यासाठी आर्सेनिक अलबम या औषधांचे वाटप करणार होती. परंतु या औषधांची निविदा प्रक्रिया वादात अडकल्याने जिल्हा परिषद आता या निधीतून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करणार आहे. १५० कॉन्सेंट्रेटर खरेदीचा निर्णय नागपूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.
कोरोना महामारीच्या संकटात सध्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद अंतर्गत ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण असून, उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. यामागचे कारण ऑक्सिजनचा अभाव असल्याचे सांगण्यात येते. शासनाकडून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा सर्वाधिक शहरातील कोरोना रुग्णालयात जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, १५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करण्यात येणार आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजाचे ८० लाख रुपये जिल्हा परिषदेकडे जमा आहे. गेल्या वर्षी यातून आर्सेनिक औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही खरेदी प्रक्रिया वादात अडकली होती. या निधीतून आता ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करण्यात येणार आहे.
- प्रत्येक पीएचसीवर तीन मशीन देण्याचा प्रयत्न आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करायच्या असल्याने शासनाकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रभारी सीईओ, जि.प.