नागपूर : संपात सहभागी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा शासनाने दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने संपात सहभागी काही कर्मचाऱ्यांना सेवा खडित करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी प्रशासनाने बजावलेल्या नोटीस, पेन्शनचा आढावा घेण्यासाठी नियुक्त त्रिसदस्यीय समिती गठन करण्याबाबत काढण्यात आलेला अद्यादेश व मेस्मा कायद्याच्या प्रतींची होळी करून आपला संताप व्यक्त केला.
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जिल्हा नागपूर यांच्या नेतृत्वात विविध संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी जि.प.कर्मचाऱ्यांनी मुख्यालयापुढे जोरदार नारेबाजी करीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते.