लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कामठी पंचायत समितीच्या महालगाव केंद्रात कापसी (खुर्द) जि.प. शाळेत कार्यरत एका शिक्षिकेचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झालेले आहे. मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात देखील ३० च्या जवळपास अधिकारी / कर्मचारी बाधित झाले असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचे परिपत्रक ८ जुलैनुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांना रु. ५० लाखाचे विमा कवच लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या मृत पावलेल्या शिक्षिकेच्या कुटुंबीयांना ५० लाखाचा विमा कवच योजनेचा लाभ मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.
नागपूर जिल्हा परिषद शिक्षिकेचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:43 AM