लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सध्या एका तृतीयपंथीमुळे त्रस्त असून हा तृतीयपंथीय मागील अनेक दिवसापासून एका एजन्सीमध्ये नोकरीची शिफारस करण्याची मागणी करीत आहे. ही शिफारस न केल्यामुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून त्रस्त करीत आहे. त्याच्यामुळे त्रस्त असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सीईओंकडे केली आहे.या तृतीयपंथीयाने जिल्हा परिषदेला दिलेल्या एका निवेदनात संबंधित सुरक्षा एजन्सीकडे नोकरी देण्याची शिफारस न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. एजन्सीने पेट्रोलियम अधिकाऱ्याची नोकरी दिल्यास मासिक २० हजार पगार हवा आहे. तसेच नोकरी देण्यासाठी संबंधित एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोपदेखील तृतीयपंथीयाने केला आहे. अशा प्रकारचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा होऊ शकतो, अशी भीती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, यासाठी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने सीईओ दौऱ्यावर असल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे, केशव हलगुले, चंद्रशेखर कोरडे, अनिल टेकाम, संजय सांबरे, विजय कुर्वे, संजय बहे, विजय तिडके आदी उपस्थित होते.