लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने ११ महिन्यासाठी अधिसंख्य केले आहे. अजूनही शासनाने त्यांच्या आस्थापनेचा व वेतनाचा प्रश्न सोडविलेला नाही. मात्र त्यांच्या झालेल्या रिक्त जागेवर पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर जि.प. मध्ये १६८ जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. यात १५५ शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी गेल्या ४ दिवसांमध्ये १५०० वर अर्ज आले आहे.आरक्षित वर्गातून शासकीय सेवा मिळविणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनुसूचित जमाती वर्गातून सेवा मिळविणारे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. शासनाने या कर्मचाऱ्यांना वारंवार संरक्षण दिले होते. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र नसलेले अधिकारी, कर्मचारी यांना सेवेत कमी करण्याबाबतचा आदेश दिला. या आदेशावर राज्य शासनाने अंमल करताना कर्मचाऱ्यांची सेवा सरसकट बंद न करता त्यांना ११ महिन्याकरिता सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेत १६८ कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर करून शकले नाही. यात सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. ११ महिने किंवा सेनानिवृत्तीचा कालावधी यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत असणार आहे. शासनाकडून अनुसूचित जमातीच्या वर्गातील रिक्त पदांची भरती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेने १६८ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेत १५५ सहा. शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसात १५०० अर्ज आले आहे. टीईटी अथवा सीटीईटी मध्ये गुणवत्ता ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोबतच जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांना द्यायचे आहे. मेरिटनुसार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तर आरोग्य विभागात दोन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ४०० च्या जवळपास अर्ज आले आहे. आरोग्य विभाग पदभरतीसाठी परीक्षा घेणार आहे.
नागपूर जि.प. : सहा. शिक्षकाच्या १५५ जागेसाठी हजारो अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:09 PM
नागपूर जि.प. मध्ये १६८ जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. यात १५५ शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी गेल्या ४ दिवसांमध्ये १५०० वर अर्ज आले आहे.
ठळक मुद्देजि.प. अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती : आरोग्य विभागातील २ पदासाठी ४०० वर अर्ज