नागपूर : जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असला तरी, सत्तेसाठी भाजपनेही आपली रणनीती आखली आहे. काँग्रेसमधील नाराज गळाला लागल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वाधिक अनुसूचित जमातीचे सदस्यही काँग्रेसकडे आहे. अशात काँग्रेसने उमेदवारी देताना इच्छुकांची भावना न सांभाळल्यास, भाजप त्या संधीची वाट बघत आहे.
१७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक आहे. काँग्रेसमधील इच्छुकांची गर्दी लक्षात घेता काँग्रेस आपला उमेदवार वेळेवर घोषित करणार असल्याचे दिसतेय. काँग्रेसने पहिल्या टर्ममध्ये अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व दिले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे भाजपदेखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सक्षम पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार आहे; पण, समीकरण जुळले तर बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजप पूर्ण तयारीत आहे. चंद्रशेखर बावनकुळे पक्षात पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याने भाजपच्या सदस्यांकडून ठोसपणे दावेदेखील केले जात आहे. सत्तेसाठी ऐनवेळी जुगाड करण्यात आमदार टेकचंद सावरकर यांचा हातखंडा आहे. आमदार झाल्यानंतरही त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पाय काढला नाही.
- काँग्रेसचे वेट ॲण्ड वॉच
शुक्रवारी अध्यक्षांच्या बंगल्यावर माजीमंत्री सुनील केंदार यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकीला माजीमंत्री राजेंद्र मुळक, सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे, अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह काँग्रेसचे सर्वच सदस्य उपस्थित होते; परंतु, कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीत अधिकृत निर्णय झाला नाही. निवडणुकीच्या दिवशीच उमेदवाराचे नाव घोषित होईल, असे सांगण्यात आले आहे.
- अडीच वर्षांत सत्तेत काही काँग्रेसचे नेते नाराज होते. ते नाराज आमच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर अपक्षांनाही बरोबर घेऊन निवडणुकीपर्यंत भाजप अध्यक्षपदाचा सक्षम पर्याय देईल.
- आतिष उमरे, विरोधी पक्षनेते, जि.प. नागपूर