नागपूर जि. प. निवडणूक : सभापतीसाठी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:38 PM2020-01-30T22:38:50+5:302020-01-30T22:42:42+5:30

सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे.

Nagpur ZP Election: Congress shouting for chairman | नागपूर जि. प. निवडणूक : सभापतीसाठी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस

नागपूर जि. प. निवडणूक : सभापतीसाठी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस

googlenewsNext
ठळक मुद्देज्येष्ठ सदस्या शांता कुमरे व नाना कंभाले यांनी व्यक्त केली जाहीर नाराजीमंत्री सुनील केदार यांच्यावर व्यक्त केला संताप

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुसूचित जमातीवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे तर नाना कंभाले यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर थेट तोफ डागत, केदारांनी गटातटाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
शांता कुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सभापती निवडीमध्ये कॉंग्रेस पक्षाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकाही सदस्याला सभापती बनविले नाही. उलट अध्यक्षांसह दोन सभापतिपदी पदावर अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यांना संधी दिली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही खेळी खेळत अनुसूचित जमाती प्रवर्गावर एकप्रकारे अन्यायच केल्याचा आरोप त्यांनी केला. शांता कुमरे ह्या रामटेक तालुक्यातील वडंबा सर्कलमधून निवडून आल्या आहे. जिल्हा परिषदेत आठ सर्कल हे अनुसूचित जमाती प्रवगार्साठी राखीव होते. त्यापैकी सात ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. शांता कुमरे या अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतात. यंदाच्या निवडणुकीमध्ये त्या खुल्या वर्गातून निवडून आल्या आहे. अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे दोन सभापती देण्याची आवश्यकता नव्हती. मलाच नाही तर सातपैकी कुणा एका सदस्याला सभापतिपद द्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नाना कंभालेची केदारांवर नाराजी
केदारांनी जिल्हा परिषदेत हस्तक्षेप करून गटातटाचे राजकारण केले असल्याचा आरोप जि.प.चे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांनी केला. मुकुल वासनिक गटाचा असल्यामुळेच ज्येष्ठ सदस्य असतानाही मला डावलण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. सुनील केदार हे स्वत:चे वर्चस्व दाखवून पार्टीमध्ये फूट पाडत असल्याचे ते म्हणाले. बाहेरून आलेल्यांना सभापतिपद देऊन निष्ठावंत काँग्रेसींना डावलल्याचे कंभाले म्हणाले. स्वत:बद्दल बोलताना कंभाले म्हणाले की, मला तिकीट कापण्यापासून, पाडण्यापर्यंत षड्यंत्र केदारांनी केल्याचाही आरोप केला. आपल्याच कार्यकर्त्यांना पदावर बसवून इतर नेत्यांचे अस्तित्व संपविण्याचा डाव केदार यांचा आहे. एका सदस्याला दोन पद देण्यावरही कंभाले यांनी आक्षेप घेतला. पत्रकारांशी बोलताना कंभाले यांनी आपली खदखद व्यक्त केली.

भाजपने दिले, काँग्रेसला काय अडचण होती
एकाच विधानसभा क्षेत्रामध्ये दोन जणांना पदाधिकारी म्हणून संधी न देण्याची काँग्रेसची भूमिका होती, असे सांगण्यात येत आहे. यावर शांता कुमरे यांनी आक्षेप घेत, भाजपने २०१२ ला एकाच विधानसभेत दोन सभापती दिले. मग काँग्रेसला काय हरकत होती, असा आक्षेप घेतला. २०१२ मध्ये जि.प.वर भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रातून दुर्गावती सरीयाम व वर्षा धोेपटे या सभापती झाल्या. त्यानंतरच्या अडीच वर्षात याच क्षेत्रातुनच शरद डोणेकर व आशा गायकवाड हे पदाधिकारी झाले. त्यामुळे अध्यक्ष पद जरी रामटेक विधानसभेतून दिले असले तरी, एक सभापतिपदही येथून देणे सहज शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Nagpur ZP Election: Congress shouting for chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.