नागपूर जि. प. निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 08:15 PM2019-12-10T20:15:38+5:302019-12-10T20:18:46+5:30
विधानभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश. जिल्ह्यात लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेसचे वाढलेल्या मताधिक्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी कॉँग्रेस पक्षात चुरस निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश. जिल्ह्यात लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेसचे वाढलेल्या मताधिक्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी कॉँग्रेस पक्षात चुरस निर्माण झाली आहे.
७ जानेवारीला होऊ घातलेल्या जि.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवड मंडळाची बैठक व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत गणेशपेठ येथील कार्यालयात या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजतापासून नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय मुलाखतींना सुरुवात झाली. जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कलसाठी ३०० हून उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यासोबतच १३ही पंचायत समितींच्या गणांसाठी ५२५ हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती सुरु होण्यापूर्वी विविध जि.प.सर्कल आणि पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी काँग्रेसच्या कार्यालयापुढे शक्तिप्रदर्शन केले. जि.प.आणि पंचायत समितीत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी युवक आणि महिलात मोठा उत्साह दिसून आला.
सर्वात आधी काटोल मतदार संघातील जि.प.सर्कल आणि पं.स.पंचायती समिती गणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर रामटेक, सावनेर, उमरेड, कामठी आणि हिंगणा मतदार संघातील मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी कामठी, सावनेर आणि उमरेड मतदार संघात मोठी स्पर्धा दिसून आली. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना काँग्रेस श्रेष्ठींचा निश्चितच कस लागणार आहे.
जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक आ.सुभाष धोटे, हर्षवर्धन सपकाळ, आ.सुनील केदार, आ.राजू पारवे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव किशोर गजभिये, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे, प्रदेश महासचिव सुरेश भोयर, जिल्हा महासचिव गज्जू यादव, कुंदा राऊत, तक्षशिला वाघधरे, आशिष मंडपे, असलम शेख, हर्षवर्धन निकोसे, नकुल बरबटे, सतीश चव्हाण, दयाराम भोयर, ज्ञानेश्वर वानखेडे, नाना कंभाले, प्रकाश कोकाटे, उपासराव भुते, शिवदास कुरडकर, चंद्रशेखर ढाकुनकर, अशोक भागवत, सतीश लेकुरवाळे आदी उपस्थित होते.
इच्छुकांचे लॉबिंग
जि.प. सर्कल आणि पंचायती समिती गणासाठी विधानसभा मतदार संघनिहाय मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवड मंडळात मुलाखतीवेळी संबंधित मतदार संघातील काँग्रेसच्या विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. मुलाखीत सुरु होण्यापूर्वी इच्छुक उमेदवार संबंधित नेत्यांकडे लॉबिंग करताना दिसून आले.
बाळाला घेऊन महिला मुलाखतीला
५० टक्के महिला आरक्षण असल्यामुळे मुलाखतीला मोठ्या प्रमाणात इच्छुकमहिला उमेदवार उपस्थित होत्या. काही महिला तर आपल्या आपल्याएक वर्षाच्या बाळापासून ते ५ वर्षाच्या मुलालाही सोबत घेऊन आल्या होत्या.