लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या राजकारणात केदार आणि देशमुख हे राजकीय वैमनस्य वर्षानुवर्षे सुरू आहे. २०१२ मध्ये देशमुखांनी भाजपाला साथ देत सत्ता मिळवित काँग्रेसला विरोधी बाकावर बसविले होते. यंदा मात्र दोघांनीही आघाडी करीत निवडणूक लढविली, मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी एककल्ली भूमिका ठेवत, राष्ट्रवादीचे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले. देशमुखांच्या विधानसभा क्षेत्रात एकही पद मिळू न देता, अध्यक्ष उपाध्यक्षासह तीन सभापतीसाठी राष्ट्रवादीचे समर्थन मिळविले. अशा प्रकारे केदारांनी देशमुखांचा गेम गेल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे.जिल्ह्याच्या राजकारणात देशमुख व केदार यांचे राजकीय वैमनस्य अनेक दशके गाजले. गेली पाच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असल्याने चर्चेला विराम होता. परंतु, आता पुन्हा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष आणि सभापतिपदाच्या वाटपावरून हा वाद राजकीय पटलावर आला. निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत लढलेल्या, पण जागा वाटपातच काँग्रेस वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात काही सर्कलमध्ये काँग्रेसने जाणून उमेदवार दिले. एवढेच नाही तर देशमुखांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने घुसखोरीही केली. मात्र केदारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीची घुसखोरी होऊ दिली नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देशमुखांचे चिरंजीव उपाध्यक्ष होईल, अशा चर्चा होऊ लागल्या. तसे प्रेशरही राष्ट्रवादीने बनविले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही मध्यस्थी केली. पण केदारांनी कुणाचेही चालू दिले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. तेव्हा राष्ट्रवादीने दोन सभापतींचा प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवला होता. दोन सभापती देत असेल तरच चर्चा करा, अशी भूमिकाही राष्ट्रवादीने घेतली होती. पण अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस एक सभापतिपद देण्याच्या भूमिकेवर कायम राहिली. त्यामुळे परत एकदा राष्ट्रवादीच्या सदस्याने भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला.विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक पद जावे असा फॉर्म्युला होता. ५ विधानसभा क्षेत्राला ते मिळालेही, मात्र देशमुखांच्या विधानसभा क्षेत्राला डावलण्यात आले. विशेष म्हणजे सहा सदस्य राष्ट्रवादी आणि शेकापचे काटोल विधानसभेत निवडून आले होते.सभापतीही दिला बंग गटाचासभापतिपदाच्या वाटपात राष्ट्रवादीला एक पद मिळाले. पण निवडणुकीत राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या देशमुख गटाला त्याचा लाभ झाला नाही. सभापतिपदही बंग गटाच्या सदस्याला देऊन, देशमुखांना हादरा दिला.