नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 08:27 PM2019-12-24T20:27:56+5:302019-12-24T20:29:01+5:30
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा जुगाड जमविला, पण शिवसेनेला सोबत घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेने एकला चलोचा नारा देत ५५ जागेवर उमेदवार उभे केले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होत असताना गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या जागा राखल्या होत्या. त्या जागेवर तेच पक्ष उमेदवार उभे करतील. मात्र इतर जागेवर समसमान वाटप करण्यात येईल. पण उमेदवारी देताना काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार पदरात पाडले. काँग्रेसने राष्ट्रवादीला ५८ पैकी १६ जागा दिल्या. पण त्यातही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या काही जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला, ६ तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व काँग्रेसने नाकारल्याची ओरड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. या नाराजीमुळे पदाधिकाऱ्यांकडून राजीनामेही पक्षाकडे पाठविण्यात आले. पण या प्रकारामुळे पक्षांमध्ये एक चुकीचा संदेश जात असल्याने नेत्यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून राजीनामे स्वीकारले नाहीत.
शिवसेनेने सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच फार्मुला जुळत नसल्याने सेनेने स्वतंत्र पाऊल उचलले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेने बहुतांश जागेवर उमेदवार उभे केले. राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. भाजपाने सर्वच सर्कलमध्ये आपले उमेदवार उभे केले असून, त्यांच्यातही काही प्रमाणात फाटाफूट झाली आहे. त्याचा फटका भाजपालाही बसणार असल्याचे चिन्हे आहेत.