नागपूर जि.प. सदस्याला मारहाण प्रकरणी गज्जू यादव काँग्रेसमधून निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:55 PM2021-07-24T22:55:31+5:302021-07-24T22:56:10+5:30
Gajju Yadav suspended from Congress जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे जि.प. सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना झालेल्या मारहाणीची प्रदेश काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू ऊर्फ उदयसिंग यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे जि.प. सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना झालेल्या मारहाणीची प्रदेश काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू ऊर्फ उदयसिंग यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी या संबंधीचा आदेश जारी केला.
सव्वालाखे यांना मारहाण झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल नागपूर विभाग प्रभारी चंद्रकांत हंडोरे व निवडणुक निरीक्षक रणजित कांबळे यांनी प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यात यादव यांनी पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या अहवालाच्या आधारावर शनिवारी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कारवाई केली.
जि.प. पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पारशिवनी तालुक्यातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यासोबत तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते गोळा झाले होते. यावेळी नगरधन सर्कलचे जि.प. सदस्य दुधाराम सव्वालाखे हे कार्यकर्त्यांसोबत बसून होते. दरम्यान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक तेथून निघून गेले. त्याच दरम्यान ‘बी’ फॉर्मच्या वाटपावरून वाद झाला होता. उदयसिंग यादव, रणवीर यादव, सचिन खागर हे तिघे तेथे दाखल झाले. त्यांनी शिविगाळ करून सव्वालाखे यांना मारहाण केली. या प्रकरणी पारशिवनी पोलिसात सव्वालाखे यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. दुधाराम सव्वालाखे हे लोधी समाजाचे असून, त्यांच्या समर्थनात लोधी समाज एकत्र आला होता. यादव यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी दबाव वाढविला होता.