नागपूर जिप अध्यक्ष निवडणूक : चंद्रकांत हंडोरे करणार काँग्रेस सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा
By कमलेश वानखेडे | Published: October 15, 2022 04:28 PM2022-10-15T16:28:03+5:302022-10-15T16:28:28+5:30
प्रदेश काँग्रेसने मागविला अहवाल
नागपूर : जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी १७ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना निरीक्षक म्हणून पाठविले आहे. हंडोरे शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाले असून ते रविवारी काँग्रेसच्या प्रदेश सदस्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसचे जिल्हा परिषदेत ३३ सदस्य आहेत. या सदस्यांना कळमेश्वर रोडवरील अंबिका फार्म हाऊस येथे नेण्यात आले आहे. मात्र, तीन सदस्य काँग्रेसच्या तंबूत पोहोचलेले नाहीत. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या पाठिंब्याने ३८ सदस्यांचे संख्याबळ असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतीपदासाठी बहुतांश सदस्य इच्छुक आहेत. मात्र, नेत्यांसमोर उघडपणे बोलायला व विरोध करायला कुणी तयार नाही. यामुळे प्रदेश काँग्रेसने निरीक्षक म्हणून पाठविलेले हंडोरे हे प्रत्येक सदस्याशी खासगीत चर्चा करणार असून त्यांचे मत नोंदवून घेणार आहेत. यानंतर हंडोरे सायंकाळपर्यंत आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील. उमेदवारासंदर्भात प्रदेश काँग्रेसकडून काही सूचना येतात की स्थानिक नेतेच उमेदवार निश्चित करतात हे सोमवारी सकाळीच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचे सभापतीपद बंग की देशमुख गटाला ?
- काँग्रेस नेत्यांशी झालेल्या चर्चेत माजी मंत्री रमेश बंग व जि. प. सदस्य सलिल देशमुख यांनी किमान दोन सभापतीपद देण्याची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीला एकच सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर हे एक पद बंग समर्थकाला मिळेल की, देशमुख समर्थकाला यावरून राष्ट्रवादीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.