लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर झाला. येत्या १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होणार आहे. तर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी पक्षाकडून अजूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरायचे आहे.जिल्हा परिषेदत काँग्रेस ३० जागांवर विजयी झाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस बहुमतात निवडून आली आहे. पण निवडणुकीत आघाडी केल्याने राष्ट्रवादीला सत्तेत वाटा देणे काँग्रेसला भाग आहे. पण राष्ट्रवादीकडून अजूनही उपाध्यक्षपदासाठी उमेदवाराच्या नावाची निवड झालेली नाही. यंदा जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्राचे वाटप व स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता विशेष सभा होणार आहे. दुपारी ३.१५ पर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. दुपारी ३.३० पर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेण्याची वेळ आहे. त्यानंतर अध्यक्षाची घोषणा जिल्हाधिकारी करणार आहे. मतदानाची वेळ आल्यास दुपारी ३.४५ वाजतानंतर मतदानही घेण्याची तयारी प्रशासनाची आहे. याच विशेष सभेत उपाध्यक्षाचीही निवड होणार आहे तर पंचायत समितीचे सभापती व उपसभापतीची निवड १७ जानेवारीला होणार असून, पंचायत समिती कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी करणार आहे.
अध्यक्ष कोण? काँग्रेसचे मौनअध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून काँग्रेसच्या चार महिला निवडून आल्या आहे. या चारपैकी अध्यक्ष कोण, याबाबत काँग्रेस पक्षाने मौन बाळगले आहे. यातील दोन महिला उमेदवार माजी मंत्री राजेंद्र मुळक तर दोन उमेदवार मंत्री सुनील केदार गटाच्या आहे. तसे जिल्हा परिषदेत यंदा केदार कटाचे निर्विवाद वर्चस्व पहायला मिळाले. कदाचित याच कारणातून काँग्रेसमधून अध्यक्ष कोण याबाबत कुणीही सांगायला तयार नाही. तसेच उपाध्यक्षपदाबाबत आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने आपली भूमिका जाहीर केली नाही़ त्यामुळे या दोन्ही पदावरील सस्पेन्स कायम आहे.