लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाची नाराजी स्वीकारते हे बघणे महत्त्वाचे आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही मंत्री सुनील केदार यांच्या गटातील सदस्यांची झाली आहे. पण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या गटाचे सदस्य अजूनही प्रतीक्षेत आहेत. तिकडे ज्येष्ठ सदस्यसुद्धा अपेक्षा ठेवून आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये शांता कुमरे, नाना कंभाले, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले तापेश्वर वैद्य, कैलास राऊत यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये निवडून आलेले काही विशेष सदस्यसुद्धा आहेत. यात मोठ्या मतांनी निवडून आलेल्या अवंतिका लेकुरवाळे, सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मुक्ता कोकड्डे यांचाही समावेश आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करताना सुनील केदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीनेही उपाध्यक्षासाठी अर्ज भरले होते. पण दोन सभापतींच्या प्रस्तावावर काँग्रेसने सकारात्मक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतले. जि.प.च्या दोन्ही मुख्य पदांवर निवड झालेले सदस्य हे सुनील केदार यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे इतर नेत्यांच्या गटातील सदस्यांना सभापतिपद मिळतील, अशी अपेक्षा आहे. पण राष्ट्रवादीला दोन सभापतिपद दिल्यास काँग्रेसमध्येच नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस राष्ट्रवादीला एक सभापतिपद देण्याच्या मानसिकतेत आहे.दुसरीकडे राष्ट्रवादीने दोन सभापतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीमध्येही सभापती पदासाठी चंद्रशेखर कोल्हे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीला दोन पदे न मिळाल्यास राष्ट्रवादी वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत आहे.अपेक्षा अनेकांच्या नेत्यांची मर्जीतसे शंकर डडमल, दुधाराम सव्वालाखे, मेघा मानकर, योगेश देशमुख, शालिनी देशमुख यांनी भाजप-सेनेच्या गडाला खिंडार पाडून काँग्रेसचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे या सदस्यांनाही सन्मानाची अपेक्षा आहे. पण नेत्यांच्या मर्जीवर सर्वकाही अवलंबून आहे.
नागपूर जि.प. सभापतींसाठी इच्छुकांची रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 9:26 PM
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत.
ठळक मुद्देकाँग्रेसपुढे आव्हान : राष्ट्रवादी दोन सभापतींच्या प्रतीक्षेत