संमिश्र भाषेचा समावेश : अनुजा दारव्हेकर यांचे नागपुरी बोलीवर संशोधनमंगेश व्यवहारे नागपूर पुरातन काळापासून नागपूरला वैभवशाली परंपरा लाभली आहे. वेगवेगळ्या संस्कृतीचा परिणाम नागपूरवर दिसतो आहे. गोंड राजाच्या काळात नागपूर ही राजधानी होती. नागपूर मध्यप्रांताचीही राजधानी राहिली आहे. भोसल्यांनी नागपूरवर राज्य केले. महाराष्ट्रात समावेश झाल्यावर नागपूर उपराजधानी झाली. त्यामुळे नागपूरवर विविध संस्कृती, समाजाचा प्रभाव पडला आहे. हाच प्रभाव बोलीतून जाणवतो आहे. हिंदी, छत्तीसगडी, झाडीपट्टी, वऱ्हाडी, संस्कृत या सर्वभाषेची सरमिसळ महाराष्ट्रात फक्त नागपूर बोलीत अनुभवायला मिळते. नागपुरातील अनुजा दारव्हेकर गेल्या तीन वर्षांपासून नागपूर बोलीवर अभ्यास करीत आहेत. त्यांच्यामते मराठी भाषेला नवा आयाम देणारी नागपुरी बोली आहे. महाराष्ट्रात पुण्यात बोलल्या जाणाऱ्या मराठीला प्रमाण भाषा संबोधल्या जाते. परंतु मराठीची मुळे विदर्भातच असल्याचे बोलले जाते. आद्यकवी मुकुंदराज यांनी आंभोऱ्याच्या तीर्थावर ‘विवेकसिंधू’ हा मराठीत पहिला ग्रंथ लिहिला. बारा कोसावर भाषा बदलते आणि बोली निर्माण होते, असे बोलले जाते. नागपूरच्या सभोवतालची बोली अनुभवल्यास चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात झाडीपट्टीचा प्रभाव जाणवतो. नागपूरला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरील छिंदवाडा, बालाघाट, शिवणी, रायपूर येथे बोलली जाणारी मराठी हिंदी मिश्रित आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा येथीलही मराठी बोलीभाषा काहीशी वेगळी जाणवते. परंतु या सर्वांची सरमिसळ नागपुरी बोलीत अनुभवायला मिळते. अनुजा यांच्या अभ्यासातून नागपूर हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून इतर शहराच्या तुलनेत अतिशय गतीने विकसित झाले. त्यामुळे नागपूर लगतच्या राज्यातून आणि विदर्भातील विविध जिल्ह्यातील लोक नागपुरात स्थायिक झाले. सर्वांना मराठी अवगत होती. परंतु प्रमाण भाषा बोलणे बाहेरून आलेल्यांसाठी अडचणीचे होते. त्यातूनच नागपूरच्या मराठी भाषेत काहीसे झाडीपट्टीचे, काहीसे वऱ्हाडीचे, हिंदीच्या शब्दांचा समावेश झाला.अनुजा यांनी भाषेचा तीन टप्प्यात अभ्यास केला. यात ध्वनी, शब्द आणि वाक्याचा समावेश होता. ध्वनी उच्चारण्यात नागपुरी बोलीत ज ला ज्य, च ला च्य, ळ ला ड उच्चार जाणवतो. नागपुरीला ग्रामीण भाषेचा ढंग लागला आहे. पणा, गी हे प्रत्ययही नागपुरी बोलीत आढळतात. त्यांनी पूर्व आणि पश्चिम नागपूर म्हणजेच पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे बोलल्या जाणाऱ्या बोलीचाही अभ्यास केला आहे. नागपुरी बोलीत खास बोलल्या जाणाऱ्या हजारो शब्दाचा यातून त्यांनी संग्रह केला आहे. हजारो वाक्यांची शब्दावली तयार केली. म्हणी, उखाणे, यांचा संचय केला. काही लुप्त होत चाललेल्या शब्दांचाही त्यांच्याकडे संचय आहे. संपर्कातून, प्रश्नावलीच्या माध्यमातून ऐकण्यातून, निरीक्षणातून त्यांचा नागपूरी बोलीवर अजूनही अभ्यास सुरू आहे.
भाषेला नवा आयाम देणारी नागपुरी बोली
By admin | Published: February 27, 2016 3:24 AM