मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरला एक वैभवशाली परंपरा लाभली आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या संस्कृतीच्या पाऊलखुणा नागपूरच्या भूमीत आढळतात. त्यामुळे येथे विकसित झालेल्या भाषेतही सर्व भाषांचे मिश्रण बघायला मिळते. नागपूरवर विविध संस्कृती, समाजाचा प्रभाव बोलीतून जाणवतो. हिंदी, छत्तीसगडी, झाडीपट्टी, वºहाडी, संस्कृत या सर्व भाषेची सरमिसळ महाराष्ट्रात फक्त नागपुरी बोलीत अनुभवायला मिळते. नागपुरातील अनुजा दारव्हेकर यांनी नागपुरी बोलीवर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएचडी बहाल केली आहे.महाराष्ट्रात पुण्यात बोलल्या जाणाऱ्या मराठीला प्रमाण भाषा संबोधल्या जाते. परंतु मराठीचे मूळ विदर्भातच असल्याचे बोलले जाते. आद्यकवी मुकुंदराज यांनी आंभोºयाच्या तीर्थावर ‘विवेकसिंधू’ हा मराठीत पहिला ग्रंथ लिहिला. १२ कोसावर भाषा बदलते आणि बोली निर्माण होते, असे बोलले जाते. नागपूरच्या सभोवतालची बोली अनुभवल्यास चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात झाडीपट्टीचा प्रभाव जाणवतो. नागपूरला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरील छिंदवाडा, बालाघाट, शिवनी, रायपूर येथे बोलली जाणारी मराठी हिंदीमिश्रित आहे.अमरावती, अकोला, बुलडाणा येथीलही मराठी बोलीभाषा काहीशी वेगळी जाणवते. परंतु या सर्वांची सरमिसळ नागपुरी बोलीत अनुभवायला मिळते. अनुजा यांच्या अभ्यासातून नागपूर हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून इतर शहराच्या तुलनेत अतिशय वेगाने विकसित झाले. त्यामुळे नागपूरलगतच्या राज्यातून आणि विदर्भातील विविध जिल्ह्यातील लोक नागपुरात स्थायिक झाले. सर्वांना मराठी अवगत होती. परंतु प्रमाण भाषा बोलणे बाहेरून आलेल्यांसाठी अडचणीचे होते. त्यातूनच नागपूरच्या मराठी भाषेत काहीसे झाडीपट्टीचे, काहीसे वºहाडीचे, हिंदीच्या शब्दांचा समावेश झाला.अनुजा यांनी केलेल्या अभ्यासात नागपुरी बोलीतील ध्वनिविचार, शब्दविचार, वाक्यविचार, नागपुरी बोलीतील विशेष शब्द, नागपुरी भाषाभेदाची कारणे याचा शोध घेतला. ध्वनी उच्चारण्यात नागपुरी बोलीत ‘ज’ ला ज्य, ‘च’ ला च्य ‘ळ’ ला ड उच्चार जाणवतो. नागपुरीला ग्रामीण भाषेचा ढंग लागला आहे. पणा, गी हे प्रत्ययही नागपुरी बोलीत आढळतात. त्यांनी अभ्यासात पूर्व आणि पश्चिम नागपूर म्हणजेच पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे बोलल्या जाणाऱ्या बोलीचाही अभ्यास केला. नागपुरी बोलीत खास बोलल्या जाणाºया हजारो शब्दांचा यातून त्यांनी संग्रह केला आहे. हजारो वाक्यांची शब्दावली तयार केली आहे. म्हणी, उखाणे, यांचा संचय केला आहे. काही लुप्त होत चाललेल्या शब्दांचाही त्यांच्याकडे संचय आहे. संपर्कातून, प्रश्नावलीच्या माध्यमातून ऐकण्यातून, निरीक्षणातून त्यांनी नागपुरी बोलीवर संशोधन केले आहे.
या संशोधनात नागपुरी बोलीच्या अनेक गमतीजमती आहेत. मर्दानी बोली आहे, महिलांच्या बोलण्यातूनही पुरुषी लकब जाणवते. संस्कृत, अरबी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दांची घुसळण यात आहे. महाराष्ट्रात नागपुरी बोली एक अजबच रसायन आहे. ती मिळमिळीत नाही, भावुक नाही, पण सर्वांना सामावून घेणारी आहे.अनुजा दारव्हेकर, संशोधनकर्ती