वसीम कुरैशी
नागपूर : संत्र्यासाठी नागपूर जगभरात प्रसिद्ध असले तरी निर्यातदारांना विमानाद्वारे विदेशात संत्री पाठविण्यात अडचणी येत आहेत. नागपुरातील सुविधांचा अभाव यासाठी कारणीभूत आहे. पाच गावे विस्थापित करून साकारण्यात आलेल्या मिहान प्रकल्पात अद्याप कार्गो फ्लाईट सुरू झालेली नाही. एवढेच नव्हे, तर शेड्यूल्ड विदेशी उड्डाणांपैकी कतर एअरवेज कार्गो नेण्यास मनाई करीत आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा विमानाद्वारे परदेशी बाजारपेठेत पोहोचविणे कठीण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच कंत्राट मिळालेली कार्गो हॅण्डलिंग कंपनी राहुल रोडवेजच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे कतर एअरवेजने त्यांच्यासोबत सध्या करार केलेला नाही. फक्त एअर अरेबियज्द्वारे भिवापुरी मिरचीसह काही कृषी उत्पादने शारजाह येथे पाठविली जातात. हा मालदेखील नागपुरातून कोणताही एक्सपोर्टर बुक करीत नाही, तर थेट मुंबईतून बुक केला जात आहे.
संत्रा निर्यातीसाठी येथे योग्य पॅकिंगची व्यवस्था व प्रोसेसिंग युनिट असावे. ही लवकर खराब होणारी वस्तू असल्यामुळे ती विमानाद्वारे थेट पोहोचविणे आवश्यक आहे. यात विलंब झाला, तर नुकसान होऊ शकते. संत्रा लवकर खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.
- आनंद डोंगरे, अध्यक्ष, नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशन, कळमना
एअर कार्गो आवश्यक
- मिहान-सेझ मधून निर्यात वाढविण्यासाठी एअर कार्गो आवश्यक आहे. एअरपोर्टपासून मिहानला जोडणाऱ्या टॅक्सी-वे ला ऑपरेशन एरियामध्ये समाविष्ट करावे लागेल. विमानांना ट्रकद्वारे न ओढता त्यांची पाॅवर टॅक्सिंग व्हायला हवी. मिहान-सेझपर्यंत थेट कार्गो फ्लाइट पोहोचली तर निर्यात वाढेल.
- मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असाेसिएशन
कतर एअरवेजची कार्गो हॅण्डलिंग कंपनीबत चर्चा सुरू आहे. लवकरच दोघांमध्ये करार होईल.आखाती देशात जातोय हापूस- एअर इंडिया एक्स्प्रेस मुंबई-शारजाह फ्लाइटने दररोज ३ ते ४ टन कार्गो नेला जात आहे. या कार्गो शिपमेंटमध्ये नाशिक व बारामतीहून आलेल्या भाज्या, फळे असतात. याशिवाय रत्नागिरीहून आणलेल्या हापुस आंब्यांची निर्यात केली जात आहे.
- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक