भारतीय फुलांचाच होणार वापर : केशरी आणि हिरव्या रंगांवर अधिक भर आनंद डेकाटे - नागपूरमहाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ‘वर्षा’ बंगला सजवण्याचे काम सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी वर्षा बंगला संपूर्णपणे फुलांनी सजवण्यात येणार आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यासह नागपुरातील रामगिरी बंगलासुद्धा फुलांनी सजवण्यात येणार असून नागपूरचे प्रसिद्ध सजावटकार मो. जहीर यांच्याकडे या दोन्ही बंगल्याला फुलांनी सजवण्याचे काम सोपविण्यात आले आहे, हे विशेष. नागपूरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आता ‘वर्षा बंगल्यातच राहणार आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. वर्षा बंगल्याला नवीन रूप दिले जात आहे. संपूर्ण बंगला फुलांनी सजवण्यात येत आहे. काश्मीर डेकोरेशनचे संचालक असलेले मो. जहीर यांनी आजवर नागपुरात झालेल्या भाजपाच्या सर्व राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. १९९७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात राष्ट्रीय अधिवेशन पार पडले तेव्हा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या देखरेखीत त्यांनी संपूर्ण व्यवस्था चोख पार पाडली होती. भाजपाच्या एकूणच कार्यक्रमांचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. फुलांमध्ये संपूर्णपणे भारतीय फुलांचाच वापर होणार असून झेंडू, लिली, गुलाब आदी फुलांचा सर्वाधिक वापर केला जाईल. भारतीय जनता पार्टीला साजेल यासाठी फुलांमध्ये केशरी आणि हिरव्या फुलांचा सर्वाधिक वापर करण्यात येणार असल्याचे मो. जहीर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. संपूर्णपणे नैसर्गिक वातावरण निर्माण व्हावे, अशी सजावट केली जाणार आहे. मुंबईसह नागपुरातील रामगिरी बंगलासुद्धा सजवण्याचे काम केले जाणार आहे. उद्या ३० आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होईल. सध्याचे वातावरण लक्षात घेता किमान चार दिवस ही फुले टिकून राहतील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
‘वर्षा आणि रामगिरी’ला नागपुरी साज
By admin | Published: October 30, 2014 12:48 AM