लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवकाशातील घटना मानवासाठी नेहमीच कुतुहलाच्या व अविस्मरणीय असतात. असाच एक दुर्मिळ खगोलीय योग बुधवारी जुळून आला. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे आणि हे तिघेही एका रेषेत आल्याने सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहणाचा योग जुळून आला. साधारणत: वर्षातून दोनदा येणारा हा क्षण. मात्र ३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) होण्यासह चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणे (सुपर मून)आणि दोन पौर्णिमा एकाच महिन्यात येणे (ब्ल्यू मून), अशा तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याचा दुर्मिळ योग तब्बल १५२ वर्षांनी बुधवारी जुळून आला. असा हा अविस्मरणीय क्षण हजारो नागपूरकरांनी रमण विज्ञान केंद्राच्या मदतीने अनुभवला.रमण विज्ञान केंद्राचे शिक्षणाधिकारी डॉ. अभिमन्यू भेलावे यांनी खग्रास चंद्रग्रहणाची माहिती देताना सांगितले, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे खग्रास चंद्रग्रहण होते. जवळपास ४.२७ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. नागपूरला सायंकाळी ६.२५ वाजता चंद्रदर्शन झाले व हे दृश्य दिसायला सुरुवात झाली. ६ वाजतापर्यंत पृथ्वीच्या उपछायेत असलेला चंद्र ६.२१ वाजता पृथ्वीच्या गडद छायेत जाण्यास सुरुवात झाली व ७ वाजतापर्यंत तो संपूर्ण गडद छायेत गेला. रात्री ८ वाजता चंद्राचे गडद छायेतून बाहेर येणे सुरू झाले व ९.३७ वाजता तो पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर चंद्रग्रहण पूर्ण झाले.आॅगस्टमध्ये परत येणार योगडॉ. भेलावे यांनी सांगितले की, सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येण्याची घटना म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण साधारणत: वर्षातून दोनदा होते. यानंतर आॅगस्ट महिन्यात पुन्हा ही घटना घडणार आहे. मात्र त्यावेळी भारतासह दक्षिण आशियाई देशात हे दृश्य बघता येणार नाही; मात्र उर्वरित जगात हे दृश्य दिसेल.सुपर मून म्हणजे काय?चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतक्या अंतरावर असतो. पण चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ तर कधी दूर जातो. चंद्र हा आज पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमीटर अंतरावर आला. त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतोय, म्हणून याला सुपर मून संबोधल्या जाते. विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्हाला चंद्र पाहायला मिळतोय.लालसर नारिंगी दिसला चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर नारिंगी दिसत होता. याबाबत माहिती देताना डॉ. अभिमन्यू भेलावे यांनी सांगितले की, या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकिरण होते व वातावरणात बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जातात. मात्र नारिंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारिंगी दिसतो. यालाच ब्लडमून असे संबोधले जाते.दोन टेलिस्कोपद्वारे हजारोंनी पाहिले दृश्यडॉ. भेलावे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातर्फे परिसरात दोन टेलिस्कोप लावण्यात आले होते. याद्वारे दीड ते दोन हजार नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी हे दृश्य जवळून पाहिले. याशिवाय स्क्रीनवर पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे नागपुरात हे दृश्य कशा अवस्थेत दिसेल यासाठी क्षणाक्षणाची माहिती जाणून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. ही घटना का, कशी व कशामुळे होते याची माहिती देण्यात आली. याशिवाय शुभ-अशुभाचा भ्रम, ग्रहणाचे परिणाम अशा नागरिकांच्या कुतूहलाचे निराकरणही डॉ. भेलावे यांनी यावेळी केले.
नागपूरकरांनी अनुभवला ब्ल्यू मून, ब्लड मून व सुपर मून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:41 PM
अवकाशातील घटना मानवासाठी नेहमीच कुतुहलाच्या व अविस्मरणीय असतात. असाच एक दुर्मिळ खगोलीय योग बुधवारी जुळून आला. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे आणि हे तिघेही एका रेषेत आल्याने सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहणाचा योग जुळून आला. साधारणत: वर्षातून दोनदा येणारा हा क्षण. मात्र ३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) होण्यासह चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणे (सुपर मून)आणि दोन पौर्णिमा एकाच महिन्यात येणे (ब्ल्यू मून), अशा तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याचा दुर्मिळ योग तब्बल १५२ वर्षांनी बुधवारी जुळून आला. असा हा अविस्मरणीय क्षण हजारो नागपूरकरांनी रमण विज्ञान केंद्राच्या मदतीने अनुभवला.
ठळक मुद्देखग्रास चंद्रग्रहणात १५२ वर्षांनी आला असा योग : रमण विज्ञान केंद्राने केली व्यवस्था