लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या करारांतर्गत जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा केला. शिष्टमंडळाचे नेतृत्व जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडनर यांनी केले. एक दिवसीय दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यावर समाधान व्यक्त केले. जास्तीत जास्त नागपूरकरांनी मेट्रो रेल्वेने प्रवास करावा, असे आवाहन केले.त्यांच्यासमवेत जर्मन दूतावासातील राजकीय विभागाच्या सल्लागार मिरियम स्ट्रॉबेल्स आणि केएफडब्ल्यू बँकेच्या शहरी विकास व मोबिलिटी विभागाचे विशेष प्रतिनिधी स्वाती खन्ना यांचा समावेश होता. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली.शिष्टमंडळाला प्रोजेक्टरद्वारे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले आणि मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, सोलर एनर्जी, ५ डी-बीम, बहुपदरी वाहतूक व्यवस्था, एएफसी प्रणालीची विस्तृत माहिती देण्यात आली. शिष्टमंडळाने खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. याशिवाय मेट्रोच्या फिडर सर्व्हिसचा भाग असलेल्या पायडल सायकलची फेरी लिंडनर आणि बृजेश दीक्षित यांनी केली. लिंडनर यांनी सायकलच्या बॅटरीची माहिती जाणून घेतली आणि हा उपक्रम मेट्रो कॉरिडोरमध्ये राबवावा, असे विचार व्यक्त केले. त्यांनी खापरी, न्यू एअरपोर्ट आणि सीताबर्डी स्टेशनवरील विविध कलाकृती तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली. चारही दिशेने सुरू असलेल्या मेट्रो कार्याचा आढावा घेतल्यानंतर जर्मनीच्या शिष्टमंडळाने मेट्रोच्या संपूर्ण कार्याची प्रशंसा केली.प्रकल्पात ग्रीन मेट्रोची संकल्पना राबविण्यात येत असून मेट्रोचा चांगला उपक्रम आहे. प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच सोलर पॅनलचा उपयोग करण्यात येत आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवावा, असे शिष्टमंडळाने सुचविले. मुख्यत्वे ५ डी व ६ डी बीमवर सुरू असलेले मेट्रोचे कार्य वेळेआधी पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.यावेळी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक(प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.