ठळक मुद्देगीत, संवादातून उलगडत गेला ‘अंदाज-ए-रफी’लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटचे आयोजन
आॅनलाईन लोकमतनागपूर : मोहम्मद रफी. भारतीय संगीतसृष्टीच्या प्रवासातील असा मैलाचा दगड ज्याच्या पुढचा टप्पा कधी कुणाला गाठताच आला नाही. अशा या महान अन् आख्यायिका ठरलेल्या गायकाला आजच्या पिढीने केवळ ऐकलेय. ते कसे दिसायचे, कसे गायचे हे या पिढीला कळावे यासाठी लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटने ‘अंदाज-ए-रफी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात स्वत: मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी गीत, संवादातून आपल्या लाडक्या वडिलांच्या अनेक न ऐकलेल्या कथा श्रोत्यांना सांगितल्या. बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमाला नागपूरकर श्रोत्यांनी तूफान गर्दी केली होती.या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, संगीततज्ज्ञ अकील अहमद, श्रद्धा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सोनाली हिवरकर, त्यांच्या सहकारी त्रिवेणी वैद्य, महदीबागचे प्रमुख अमीर मलक आणि हार्मोनी इव्हेंटचे संचालक राजेश समर्थ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. संजय पोटदुखे यांनी ओ दुनिया के रखवाले...या रफी साहेबांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. आसमा से आया फरिश्ता...हे गीत गात गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट करणारे सुनील वाघमारे मंचावर आले. अखेर तो क्षण आला जेव्हा शाहीद रफी यांच्या नावाची घोषणा झाली. मोहम्मद रफी यांचा मुलगा नेमका कसा दिसतो, कसा गातो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना प्रेक्षकांमधून एक गोड आवाज निनादायला लागला. बडी दूर से आये हैं....गात शाहीद रफी यांनी थेट श्रोत्यांमधून एन्ट्री घेतली आणि त्यांची एक झलक टिपण्यासाठी शेकडो मोबाईल कॅमेरे एकाच वेळी पुढे सरसावले. यानंतर सलग चार गाणे सादर करीत शाहीद यांनी श्रोत्यांना अक्षरश: वेड लावले. बार बार देखो..., गुलाबी आँखें..., आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे...या त्यांच्या गीतांवर श्रोत्यांनी मनसोक्त फेर धरला. चाँद मेरा दिल..., दर्दे दिल दर्दे जिगर...बने चाहे दुश्मन...ही गाणीही त्यांनी अतिशय तन्मयतेने सादर केली. त्यांना सारेगामा फेम आकांक्षा नगरकर हिने सुरेल साथ दिली. प्रसिद्ध पार्श्वगायक एम. ए. कादर, झीनत कादर यांनीही आवारा हुवा बादल...सारखे गाणे गात रफी साहेबांच्या सोनेरी काळाची आठवण करून दिली.या सर्व गायकांना की-बोर्डवर पवन मानवटकर, राजा राठोड, गिटार- प्रकाश चव्हाण, बेस गिटार- रॉबिन विलियम, ड्रम-अशोक ठवरे, आॅक्टोपॅड- नंदू गोहणे, ढोलक- बालू यादव, तबला- अशोक तोकलवार, तुंबा कांगो- राजेश धामणकर तर तालवाद्यावर उज्ज्वला गोकर्ण यांनी सुरेल सहसंगत केली. या कार्यक्रमाची संकल्पना-निवेदन राजेश समर्थ यांचे होते. उद्घाटनीय सत्राचे संचालन सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
फकिराने दिली प्रेरणाया कार्यक्रमात श्रोते आणि शाहीद यांच्यात मनमोकळा संवाद रंंगला. रफी साहेबांना गाण्याची प्रेरणा कुठून मिळाली, या प्रश्नावर शाहीद म्हणाले, बाबा लहान असताना पंजाबमधल्या घरासमोरून एक फकीर रोज गात जायचा. बाबा त्याच्या मागे जायचे व त्याला ऐेकत राहायचे. एक दिवस त्याने बाबांना गायला सांगितले तेव्हा त्यांनी त्या फकिराचेच गाणे गायले. ते इतके अप्रतिम झाले की त्या फकिराने बाबांना तू मोठा गायक होशील असा आशीर्वाद दिला आणि बाबा खरंच मोठे गायक झाल्याचे शाहीद यांनी सांगितले. याशिवाय शाहीद यांनी रफी साहेबांची आवडती गाणी, त्यांच्या आयुष्यातील चढउतार, त्यांचा मित्रपरिवार, त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी अशा विविध पैलूंवर रंजक प्रकाश टाकला. गच्च भरलेले सभागृहही रफी साहेबांच्या या आठवणींमध्ये हरखून गेले.