मुलायमसिंग यादव यांच्या निर्णयाने कार्यकर्ते नाराज : फेरविचार करण्याची मागणी नागपूर : समाजवादी पार्टीत महाभारत सुरु आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर केले. मात्र असे असले तरी नागपूरकर समाजवादी अखिलेशसोबत दिसून येत आहे. समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष व सपा युवजनचे प्रदेश अध्यक्ष अफजल फारुख यांनी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील सपा अखिलेश यादवसोबत असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, अखिलेश यांच्या नेतृत्वातच उत्तर प्रदेशचा विकास झाला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांच्या मार्गदर्शनातच आगामी मनपा आणि नगर परिषदेच्या निवडणुका लढणार आहे. ‘लोकमत’ शी चर्चा करताना फारुख म्हणाले, महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून कार्यकर्ते सपासोबत निष्ठेने काम करीत आहे. परंतु मुलायमसिंग यादव यांनी शुक्रवारी घेतलेल्या निर्णयाने सर्वांना ठेच पोहोचली आहे. सर्व कार्यकर्त्यांचे राजकीय भविष्य डावावर लागले आहे. त्यामुळे मुलायमसिंग यादव यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशीही त्यांनी मागणी केली. तसेच पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा माया चवरे यांनीही नागपूरकर समाजवादी अखिलेश यादवसोबत असल्याचे यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) अमरसिंग यांनी फूट पाडली यावेळी अफजल फारुख यांनी समाजवादी पार्टीतील या घडामोडीसाठी अमरसिंग यांना जबाबदार ठरविले. ते म्हणाले, अमरसिंग यांनीच यादव कुटुंबात फूट पाडली आहे. पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी हा निर्णय अमरसिंग यांच्या दबावात घेतला आहे. त्यांच्याच दबावात मुलायमसिंग यांनी कमाल अख्तर यांचे तिकीट कापले. त्यामुळे अखिलेश यादव नाराज होते. मुलायमसिंग यांनी मुख्यमंत्री असताना सर्व निर्णय स्वत:च घेतले. ते कुणाच्याही दबावात आले नाही. त्यामुळे आताही त्यांनी तसाच निर्णय घ्यावा, अशी यावेळी फारुख यांनी अपेक्षा व्यक्त केली.
नागपूरकर समाजवादी अखिलेशसोबत
By admin | Published: December 31, 2016 2:55 AM