लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सिनेमात अभिनयाची कर्मशाळा मानले जाणारे चित्रपटसृष्टीचे बेताज बादशाह दिलीप कुमार यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली. त्यातील बहुतेक भेटीदरम्यान या महान कलावंताच्या साधेपणाने नागपूरकरांवर भुरळ पाडली, जी आजही कायम आहे. साई मंदिराच्या कार्यक्रमासह देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी नागपूरला येणे कायमच सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.
नागपूरचे कलावंत व कादर ऑर्केस्ट्राचे संचालक कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. वर्धा रोडवरील साई मंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी महान शास्त्रीय गायक पं. भीमसेन जोशी यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम होता व दिलीप कुमार प्रमुख पाहुणे होते. नागपूरकर कलावंतांच्या भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाल्याचे कादर यांनी सांगितले.
नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. एनकेपी साळवे यांनी त्यांना आणले होते. इतका साधेपणा आणि प्रत्येकाशी आदराने बोलण्याची त्यांची अदा होती. त्यांच्या वागण्या-बाेलण्यात कुठलाही आव नव्हता. भारतीय सिनेसृष्टीचा लिजेंड आपल्यासाेबत आहे, अशी कसलीही जाणीव त्यांनी हाेऊ दिली नाही. आम्ही कलावंतांनी कार्यक्रमात गझल सादर केल्या तेव्हा त्यांनीही कलावंतांची भरपूर प्रशंसा केली. त्यावेळी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव दिलीप कुमार यांच्या चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका नाचे रे...’ हे गाणे सादर केले. तेव्हा प्रेक्षकांसह स्वत: दिलीप कुमार चांगलेच खूश झाले. नागपूरने कायमच सन्मान दिला आहे आणि येथे येणे सुखद अनुभव वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. पुढे काही वर्षांनी कादर भाई मुंबईला दिलीप कुमार यांच्या घरी भेटायला गेले हाेते. त्यावेळी नागपूरच्या हालहवालाबाबत अतिशय आस्थेने विचारपूस करीत नागपूर भेटीच्या आठवणी काढत तास-दीड तास गप्पा मारल्याचे कादर यांनी सांगितले. इतका माेठा कलावंत आपल्याशी इतक्या आपुलकीने बाेलत आहे, या गाेष्टीचे आजही नवल वाटत असल्याची भावना कादर भाई यांनी व्यक्त केली.
- मुंबईपासून विजय दर्डा यांची साेबत
१९९८ ला लोकसभा निवडणुकीदरम्यान एका कार्यक्रमासाठी दिलीप कुमार नागपूरला आले होते. त्यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार आणि तत्कालीन इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनीच त्यांना विमानाने मुंबईहून नागपूरला आणले होते. नागपूर विमानतळावर लोकमत प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली. आजही काँग्रेस पक्षाकडून मोठ्या आशा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाशी जुळले असलेले दिलीप कुमार यांनी राजकीय अनुभव सांगितले हाेते.