नागपूर : उपराजधानीत मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच गारठा वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे आजाराचा धोकाही वाढला आहे. सर्दी, खोकला, ताप, अतिसार व दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धाचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सर्दी, खोकला, तापाची कणकण, घसा खवखवणे हा ‘सिझनल अॅलर्जी’ आजार आहे. यात नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असतो. यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोके वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने त्यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. ब्राँकायिटससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजरही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुऊन खावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. लहान बाळांना गरम कपड्यात ठेवावे, असेही ते म्हणाले.
खबरदारी न घेतल्यास कोरोना वाढणार
फिजिशियन डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशीच लक्षणे कोरोनामध्येही दिसून येतात. सध्याचे वातावरण कोरोना विषाणूसाठी पोषक आहे. यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका, असा सल्लाही डॉ. जयस्वाल यांनी दिला.