लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर लघुपट साकारण्याचा मान नागपूरकरांनी पटकावला असून, हा लघुपट प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. बहुजन समाज व आंबेडकरी समाज यांच्यात सौहार्द्राचे वातावरण वृद्धिंगत व्हावे, त्याअनुषंगाने या चित्रपटाची निर्मिती केल्याची माहिती निर्माते दिलीप जाधव यांनी पत्रपरिषदेत दिली.‘ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड’ हा अर्ध्या तासाचा लघुपट तयार करण्यात आला असून, महाल येथील ऐतिहासिक वाड्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. गायकवाड यांच्या सामाजिक कार्यावर आधारित हा लघुपट असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. आंबेडकर यांच्या भेटीपासून ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा पट या लघुपटात मांडण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले. या चित्रपटात प्रमोद भुसारी यांनी महाराजांची भूमिका साकारली असून, लेखन प्रभाकर दुपारे यांचे तर दिग्दर्शन नरेंद्र शिंदे यांचे आहे. लघुपटात देवेंद्र लुटे, विनोद काळे, अशोक गवळी, प्रथमेश वलिवर, प्रकाश शिवणकर, अश्विनी गोरले, दर्शना बनसोड, जय जाधव, रिहान दुपारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच इतर वाहिनींवर प्रसारित करण्यासोबतच देश-विदेशातील चित्रपट महोत्सवात पाठविला जाणार असल्याचे दिलीप जाधव यांनी सांगितले.