नागपूर: सध्या थंडी खूप वाढली आहे, लहान मुले, घरातील वृद्ध यांच्यासह घरातल्या पाळीव प्राण्यांनाही या बोचऱ्या कडाक्याच्या थंडीत आपल्या कुटुंबातील सर्व जण एकमेकांची काळजी घेतातच, स्वेटर, मफलर, शाल, हातमोजे आणि झोपताना ब्लॅंकेट आवर्जून वापरात आणले जात आहेत.
घरातील माणसांची काळजी तर सगळेच घेतात पण रस्त्यावर, फुटपाथवर आपल्यासारखीच हाडामासाची माणसे या कुडकुडणाऱ्या थंडीतही तशीच अंगावरच्या कपड्यावरच झोपी जाताना दिसतात. पुरेशा पैशाच्या अभावामुळे हलाखीचे जगणे जगताना जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार ब्लॅंकेट मिळणे ही तर अवघड आणि अशक्य बाब, मात्र हे सगळे जाणवून मनात हळहळ व्यक्त करून थांबण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काहीतरी करता आले तर, अगदी याच विचाराने नागपूरमधील आशिष अतकरी या तरुणाने स्वतःच्या कमाईतून या रस्त्यावरच्या उघड्यावर संसार थाटलेल्यांना माणुसकीची ऊब मिळावी म्हणून ब्लॅंकेट देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या विचाराला कृतीची साथ देण्यासाठी गौरव पेंडके, मंदार धानोरकर, रोहित नागमोटे या मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला.
सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले आणि बघता बघता तब्बल अडीचशे ब्लॅंकेट जमा झाली. हि जमा झालेली ब्लॅंकेट एकत्र करून या सर्वांनी नागपूर शहरातल्या साई मंदिर परिसर, गणेश टेकडी परिसर, रेल्वे स्टेशन, यशवंत स्टेडियम, आरबीआय स्क्वेअर,मिठा निम दर्गा, हनुमान मंदिर परिसर, राम नगर परिसर, खामला परिसर, महाराज बाग रोड, शनी मंदिर रोड आणि मेयो हॉस्पिटल परिसर या भागात स्वतः जाऊन गरजू नागरिकांकडे दिले. त्यामुळे न मागता मिळालेली ही मायेची ऊब पाहून त्या गरजवंताच्या चेहऱ्यावरही माणुसकीचे स्मित हास्य उमटले.