काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे नागपूरकर नेत्यांना सोयरसुतकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 11:43 AM2020-12-25T11:43:53+5:302020-12-25T11:44:13+5:30

Nagpur News ‘काँग्रेस से सिर्फ लेने का... देने का नहीं’, अशीच स्वार्थी भूमिका नागपूरकर काँग्रेस नेत्यांनी घेतली आणि संघभूमीत काँग्रेसचा एकात्मतेचा नारा बुलंद करण्याची आयती संधी गमावली.

Nagpurkar leaders do not care about the centenary of the Congress convention | काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे नागपूरकर नेत्यांना सोयरसुतकच नाही

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे नागपूरकर नेत्यांना सोयरसुतकच नाही

Next
ठळक मुद्देकाँग्रेस से सिर्फ लेने का... देने का नहीं !

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : २६ ते ३१ डिसेंबर १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसने ‘हात’ दिल्याने नागपुरातील अनेक नेते मोठे झाले. गल्लीसह दिल्लीपर्यंतच्या राजकारणात त्यांचे नाव झाले. मात्र, त्याच नागपुरात झालेल्या अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवासाठी एकाही नेत्याने पुढाकार घेतला नाही. काँग्रेस विचारधारा मांडणाऱ्या चार विचारवंतांची व्याख्याने ठेवली नाहीत की जुन्या जाणत्या काँग्रेसींचा सत्कार सोहळा केला नाही. निवडणुकीत न चुकता काँग्रेसचा झेंडा मिरविणाऱ्यांनी शताब्दीनिमित्त ‘चौक तेथे झेंडा अन् वस्ती तेथे तोरण’ लावण्यासाठी साधा पुढाकारही घेतला नाही. ‘काँग्रेस से सिर्फ लेने का... देने का नहीं’, अशीच स्वार्थी भूमिका नागपूरकर काँग्रेस नेत्यांनी घेतली आणि संघभूमीत काँग्रेसचा एकात्मतेचा नारा बुलंद करण्याची आयती संधी गमावली. नेत्यांच्या या भूमिकेवर जुने जाणत्या काँग्रेसींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

२६ डिसेंबर १९२० रोजी काँग्रेसनगर येथे हे अधिवेशन झाले होते. येत्या २६ डिसेंबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर काँग्रेसमय झाल्याचे चित्र पाहायला मिळणे अपेक्षित होते. अ.भा. काँग्रेस कमिटीमध्ये रमलेले महासचिव मुकुल वासनिक, काँग्रेसच्या भरवशावर तब्बल ३५ वर्षे दिल्लीत डेरा टाकून बसणारे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विविध राज्यांत प्रभारींची भूमिका पार पाडणारे माजी खासदार अविनाश पांडे, राज्यात महत्त्वाचे ऊर्जा खाते सांभाळत असलेले पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद अशी दिग्गज नेत्यांची फौज नागपूर काँग्रेसशी संबंधित आहे. संबंधित नेत्यांनी गटबाजीत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावल्याची उदाहरणे नागपूरकरांनी अनुभवली आहेत. या नेत्यांनी आदेश दिला तर दुसऱ्या मिनिटाला कार्यकर्ते तुटून पडतात. संबंधित नेत्यांनी एकत्र येत शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम आखणे, जुन्या जाणत्या काँग्रेसींचा सत्कार करणे तसेच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून घरोघरी काँग्रेसची विचारधारा पोहचविण्यासाठी नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, कुणीच पुढाकार घेतला नाही.

आ. विकास ठाकरे यांच्यावर नागपूर शहराच्या अध्यक्षपदाची तर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे जिल्ह्याची धुरा आहे. पक्षात कुठलाही कार्यक्रम असला की पहिला मान अध्यक्षांचाच असतो. दोन्ही नेते दिग्गज व नियोजनात मास्टर आहेत. मात्र, या नेत्यांनी काँग्रेसची शताब्दी साजरी करण्यासाठी कुठलेही नियोजन केले नाही. खरे तर पक्षाला दिशा देणे, कार्यक्रम राबविणे ही अध्यक्षांची पहिली जबाबदारी असते. मात्र, पक्षाच्या एकूणच व्यवस्थेवर अधिकार गाजविणाऱ्या या नेत्यांना कर्तव्याचा सोयीस्कर विसर पडला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात तेवढी एक बैठक झाली. मात्र, तिलाही असहकाराचे ग्रहण लागले. काहीच फलित झाले नाही.

कोरोनाचे हास्यास्पद कारण देताहेत

- शताब्दी साजरी न करण्यामागे आता कोरोनाचे कारण समोर केले जात आहे. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढत असलेल्या काळात याच नागपुरात काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत धरणे दिले. भाषणे ठोकली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली. परवाच्या पदवीधरच्या निवडणुकीत तर नेत्यांना बसायलाही स्टेजवर खुर्च्या कमी पडल्या. त्यामुळे राजकीय उद्देशासाठी एकत्र येत आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी शताब्दी महोत्सव साजरा न करण्यामागे कोरोनाचे कारण देणे हास्यास्पद आहे.

नेत्यांनी अंगीकारले ‘असहकार’

- असहकार आंदोलनाच्या ठरावाला अंतिम मंजुरी काँग्रेसच्या नागपुरातील अधिवेशनात मिळाली होती. मात्र, नागपूरकर काँग्रेस नेत्यांनी ते ‘असहकार’ वेगळ्याच पद्धतीने अंगीकारले. शताब्दी साजरी करण्यासाठी एकत्र येण्याऐवजी असहकाराची भूमिका घेतली.

तिकिटांसाठी आग्रह धरणारेही गारठले

- नागपूर शहर व जिल्ह्यात विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान तीन-चार तगडे इच्छुक असतात. पक्षाकडे तिकिटासाठी अर्ज करतात. लॉबिंगसाठी दिल्लीवारी करतात. मात्र, दुसऱ्या फळीतील हे तीन-चार डझन नेतेही गारठले आहेत. शताब्दी महोत्सवाची साधी वाफही एकाच्याही तोंडून निघाली नाही.

नेत्यांचा आदेश नसल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ

- शताब्दी महोत्सव साजरा करावा, यासाठी तळागाळात राबणारा निष्ठावान कार्यकर्ता उत्साहात आहे. मात्र, त्याला अद्याप नेत्यांकडून कुठलाच आदेश किंवा सूचना मिळाली नसल्याचे तो अस्वस्थ आहे. शहरात काँग्रेसचे वातावरण तयार करण्याची एक चांगली संधी होती. वर्षभरावर असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हालाच फायदा झाला असता. पण नेते महापािलकेची निवडणूक लढत नाहीत ना, त्यामुळे त्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, अशी खंतही कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Nagpurkar leaders do not care about the centenary of the Congress convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.