नागपूर : राज्यभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या, तसेच प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत रविवारी नागपूरसह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक ‘बिनधास्त’ धावले. या स्पर्धेच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीतील प्रसन्न वातावरणात स्पर्धकांसह क्रीडा रसिक, शालेय विद्यार्थी, धमालपथकांनी सळसळता उत्साह निर्माण केला आणि हा क्षण एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. व्यावसायिक धावपटूंबरोबरच, हौशी धावपटूंचा विशेषत: महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
‘लोकमत’चे आयोजन म्हणजे भन्नाटच..! वेगळेपण, उत्कंठावर्धक, लक्षवेधी, जोश, उत्साह अशा विशेषणांनी आयोजन क्रीडा रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहतात. त्याचीच प्रचिती रविवारच्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरकरांना आली.
‘लोकमत’ने आवाहन करताच हजारो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ‘भागो बिनधास्त’ ही टॅगलाइन असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने चार दिवस अगोदरच खेळाडूंची नोंदणी थांबवावी लागली. त्यामुळे अनेक खेळाडूंना सहभाग घेता आला नाही. परंतु, त्यांनी सहभागी खेळाडूंचा उत्साह मात्र रस्त्यावर येऊन वृद्धिंगत केला.
रविवारची पहाट नागपूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन उगवली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे कस्तुरचंद पार्कवरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल-ताशांच्या गजराने भेदली. मैदानावरील चैतन्यमय माहौल पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. ‘बिनधास्त’ धावण्यासाठी सज्ज झाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी, तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला.
अखेर उत्कंठा संपली...
सकाळी सहा वाजता २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनला उपस्थित मान्यवरांनी झेंडा दाखविला. हाफ मॅरेथॉन ही व्यावसायिक धावपटूंसाठी असल्याने पाच... चार... तीन... दोन... एक असे म्हणत झेंडा दाखविताच क्षणाचाही विलंब न करता धावपटूंनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. या गटात राज्यभरातील विविध शहरांत होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने दहा किलोमीटर पॉवर रनला सुरुवात झाली.