लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर युवा लेखक सिद्धार्थ रॉय याचा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने (२०१८-१९) गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून संबंधित वर्षासाठी सन्मानित झालेला तो एकमेव तरुण आहे. सिद्धार्थने शालेय जीवनापासूनच पुस्तक लेखन सुरू केले होते व त्याच्या योगदानासाठी त्याला सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या तरुण व सामाजिक संघटनांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सिद्धार्थने स्पेशल फिश व राईज इन लव्ह या पुस्तकातून युवा संस्कृती, कौटुंबिक जिव्हाळा यासारखे विषय हाताळले आहेत. सिद्धार्थ हा नावाजलेला ब्लॉगरदेखील असून, लहान वयापासूनच तो विविध प्रसारमाध्यमांसाठीदेखील लेखन करतो. त्याच्या आजवरच्या कार्यासाठी त्याला सन्मानित करण्यात आले. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते त्याला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
१७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद
सिद्धार्थ हा पब्लिक स्पीकरदेखील असून, अनेक प्रेरणा देणारी व्याख्याने त्याने दिली आहे. आतापर्यंत ५० हून अधिक व्याख्यान्यांच्या माध्यमातून त्याने १७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. सकारात्मक विचारसरणी, व्यवस्थापन यावर त्याचे व्याख्यान आधारित असते. याशिवाय नियमितपणे लेखन, कौशल्य विकास या मुद्द्यांवर कार्यशाळांनादेखील तो मार्गदर्शन करत असतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथेदेखील त्याला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
मनपा शाळांना सुधारण्यासाठी प्रयत्न
सिद्धार्थ विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्थानिक महानगरपालिका शाळांच्या पायाभूत सुविधा व व्यवस्थापन सुधारण्यासाठीदेखील काम करत आहे. विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद कसा असावा यासाठी विशेष प्रकल्पदेखील विकसित करत आहे. कोरोना काळात गरजूंसाठी टेलिमेडिसीन मंच तयार करण्यात तसेच मदत सामग्री वाटपातदेखील त्याचा पुढाकार राहिला होता.
समाजहिताचेच काम करायचे आहे
समाजासाठी विधायक काम करण्याचे लहानपणापासूनच ध्येय ठेवले आहे. त्यातूनच लेखनाची प्रेरणादेखील मिळत गेली. युवावर्ग विविध समस्यांशी सामना करत असून त्यांच्यातील कौशल्याच्या विकासासाठी प्रयत्न करायचे असल्याची भावना सिद्धार्थने व्यक्त केली.