नागपूर : काेरेगाव भीमा येथे झालेल्या युद्धाला केंद्रस्थानी साकारलेल्या नागपूरकर कलावंताच्या कलाकृतीला आंतरराष्ट्रीयस्तरावर बहुमान मिळाला आहे. नुकतेच काेरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात नागपूरचे प्रा. गणेश तायडे यांनी साकारलेली वाॅर ऑफ राईट्स ही पेंटिंग सामील करण्यात आली.
प्रा. तायडे हे मुंबईच्या आर्ट काॅलेजमध्ये प्राध्यापक हाेते. कलाक्षेत्रात मुक्तपणे कार्य करण्यासाठी २०१५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. दरम्यान, १८१८ मध्ये घडलेल्या काेरेगाव भीमाच्या युद्धाला २०० वर्षे पूर्ण हाेत असल्याच्या निमित्ताने समता सैनिक दलाचे मार्गदर्शक ॲड. विमलसूर्य चिमणकर यांच्या आग्रहावरून त्यांनी ही पेंटिंग साकार केली हाेती. काेरेगाव भीमा येथे झालेल्या युद्धात ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांचा पाडाव केला हाेता. या युद्धाचा विजयनायक हाेता सिद्धनाक हा सेनापती. याच सिद्धनाकला केंद्रस्थानी ठेवून प्रा. तायडे यांनी युद्धाची भूमी चितारली हाेती.
काेरियाच्या युईजाॅंग्बु सिटी येथे १४ ते २७ ऑक्टाेबरदरम्यान हे कलाप्रदर्शन भरले हाेते. या प्रदर्शनात जगभरातून कलाकृती पाठविण्यात आली हाेती. त्यातील १७ देशांमधून ११७ पेंटिंगची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. भारतातून केवळ प्रा. तायडे यांच्या एकमेव कलाकृतीची निवड झाली आहे. हा नागपूरकरांसाठी बहुमान ठरला आहे.